त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही
सिद्दिकी हत्या प्रकरणी शरद पवारांची टीका : भुजबळांनीही सरकारला दिला घरचा आहेर
मुंबई
काल मुंबईतील वांद्रे भागात माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येनंतर आता मुंबईत दहशतीचं वातावरण आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना डिटेल देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. दिवस फार थोडे राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणं आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणं हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असं शरद पवार म्हणालेत.
भुजबळ यांचा घरचा आहेर
दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला. भुजबळ म्हणाले ‘बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे. बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षांपासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षादेण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करत होते?’, असा सवाल करत छगन भुजबळ य़ांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले, आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृण पणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 /20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.