पाणीपुरी विक्रेत्यावर चाकू हल्ला !
चौघांवर गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी – शहरातील गांधी उद्यानाच्या गेटसमोरील परिसरात मंगळवारी (२ डिसेंबर) दुपारी दीड वाजता ‘माझ्याकडे का पाहतो?’ या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादातून पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारात पाणीपुरी विक्रेता व त्याचा भाऊ गंभीररित्या जखमी झाले असून, चौघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्राट कॉलनीतील विकास भागवत लिहेलकर (वय २७) आणि त्यांचा भाऊ चेतन लिहेलकर गांधी उद्यानाजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. दुपारी संशयित जगदीश लक्ष्मण लिहेलकर याने विकास यांना ‘तू माझ्याकडे काय पाहतो?’ अशी उलटतपासणी करत वादाला सुरुवात केली. काही क्षणात यश जगदीश लिहेलकर, निलेश विनोद लिहेलकर आणि दिनेश प्रवीण लिहेलकर हेही तेथे आले आणि दोघा भावांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
वाद चिघळताच चौघांनी मिळून विकास व चेतन लिहेलकर यांना बेदम मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना आरोपींनी कांदा कापण्याच्या सुरीने विकास यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जखमी विकास यांनी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार संजय सोनवणे पुढील तपास करीत आहेत.