पैसे परत करण्याच्या वादातून महिलेवर हल्ला
रामदेववाडी येथील घटना ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव: रामदेववाडी येथे राहणाऱ्या मिराबाई हंसराज राठोड (वय ५०) या महिलेला पैसे परत करण्याच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आली. दिनांक १६ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रामलाल कोल्हा राठोड व त्यांचा मुलगा बबन रामलाल राठोड (दोघे रा. रामदेववाडी, ता. जळगाव) यांनी तिच्या डोक्यात लोखंडी सळई टाकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिराबाई राठोड या शेतीकाम करतात. रात्रीच्या सुमारास रामलाल कोल्हा राठोड त्यांच्या घराजवळ आला व त्याने तिच्या मुलाने त्याच्या जावायाकडून घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रामलाल राठोडने लोखंडी सळईने मिराबाई यांच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच बबन रामलाल राठोड याने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
याबाबत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघांवर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.