भरदिवसा वृद्धेच्या घरात घरफोडी करणारा जेरबंद
रामानंद नगर पोलिसांची कारवाई, १९ हजारांचा ऐवज हस्तगत
जळगाव प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगर येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव उर्फ गोल्या दत्तात्रय पाटील (वय २४, रा. गणपती नगर) याने वृद्ध महिलेच्या घरात चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून १० हजारांची रोकड आणि ९ हजार रुपये किमतीचे पितळाचे भांडे हस्तगत केले आहे.
गणपती नगर येथे राहणाऱ्या विमल सिरसाठ या आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या असताना, आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून २५ हजारांची रोकड आणि मौल्यवान पितळाचे भांडे लंपास केले. विमल सिरसाठ यांनी घरी परतल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला आणि त्वरित रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
२४ तासांत गुन्ह्याची उकल
पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार आणि रविंद्र चौधरी यांच्या पथकाने तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिरसाठ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या वैभव उर्फ गोल्या पाटील यानेच चोरी केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून त्याच्याकडून १० हजारांची रोकड आणि ९ हजारांचे पितळाचे भांडे जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहेत.