लग्नात पिस्तूल-तलवारीचा थरार; व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

0

लग्नात पिस्तूल-तलवारीचा थरार; व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

धरणगावातील गॅस गोडाऊनजवळील प्रकार; संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे पथक बीडकडे रवाना

जळगाव : लग्न समारंभाच्या आनंदावर पिस्तूल व तलवारीचे प्रदर्शन करत दहशत माजविण्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हातात पिस्तूल व तलवार घेऊन डिजेवर नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर झाला असून, हा प्रकार धरणगाव येथील भारत गॅस गोडाऊन परिसरात घडल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. व्हिडीओची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांच्या शोधासाठी एक पथक बीड येथे रवाना करण्यात आले आहे.
धरणगाव येथील भारत गॅस गोडाऊनजवळ विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डिजेवर गाणी सुरू असताना काही तरुण बेधुंद नाचत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान पोलिसांसारखा पेहराव परिधान केलेल्या एका इसमाने त्याच्याकडील पिस्तूल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले. त्यानंतर त्या तरुणाने पिस्तूल हवेत उंचावत ‘जलने वालो को जलने दे’ या गाण्यावर नाचत दहशत निर्माण केल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसते. त्याच ठिकाणी आणखी एक युवक हातात तलवार घेऊन ‘तो बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर नाचत असल्याने पाहुण्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
लग्नात उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होताच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शस्त्रांचे खुलेआम प्रदर्शन आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दहशत लक्षात घेता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायर झालेला हा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ व्हिडीओची सत्यता पडताळून तो पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असून व्हिडीओतील तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.