हातात सुरा घेऊन दहशत माजवणारा जेरबंद!
जळगाव: शहरातील मोहाडी रस्त्यावर हातात सुरा घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. १४ मार्च सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
एमआयडीसी पोलिसांना सागर किरण बाविस्कर (वय २१, रा. समता नगर) हा सार्वजनिक ठिकाणी हातात सुरा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस कर्मचारी नितीन ठाकूर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सागरला ताब्यात घेतले.
संशयिताकडून सुरा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ रामदास कुंभार करत आहेत.
शहरात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी यासारख्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.