गतिमंद विद्यार्थ्यांला शिपाई व केअरटेकरकडून कूकरच्या झाकणाने मारहाण
छत्रपती संभाजीनगरात संतापजनक घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, निलंबनासह विभागीय चौकशी सुरू
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मांडकी (गोपाळपूर) येथील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात घडलेला संतापजनक प्रकार समोर आला असून, शाळेतील शिपाई आणि केअरटेकर यांनी गतिमंद विद्यार्थ्यांना कूकरच्या झाकणांनी तसेच लाथा-बुक्क्यांनी निर्दयतेने मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज उघड झाले आहे. हा अमानवी प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली असून, जिल्हाभर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने तत्काळ कारवाई करत शिपाई दीपक गोविंद इंगळे (रा. मांडकी गोपाळपूर) आणि काळजीवाहू प्रदीप वामन देहाडे या दोघांवर निलंबनाची कारवाई केली असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सखाराम पौळ यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, मांडकी येथील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात ६ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल ५० गतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या देखभालीसाठी २६ कर्मचारी कार्यरत असून, शाळेमध्ये सुरक्षेसाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. काही दिवसांपूर्वी शिपाई इंगळे हा विद्यार्थ्यांना कूकरच्या झाकणाने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना प्रकाशात आली.