वर्षभर फरार असलेला दुचाकी चोरटा अखेर एलसीबीच्या जाळ्यात!
जळगाव धरणगाव: धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेला संशयित अखेर एलसीबीच्या पथकाच्या जाळ्यात सापडला. लक्ष्मीनगर भागातील शेख शाहरुख शेख न्यामतुल्ला खाटीक (वय ३०) याला एलसीबीच्या पथकाने अटक केली असून, पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान!
धरणगाव शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर येत होत्या. यापैकी काही प्रकरणांत शेख शाहरुख शेख न्यामतुल्ला खाटीक हा मुख्य संशयित असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मात्र, तो गेल्या वर्षभरापासून फरार होता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
एलसीबीच्या पथकाला संशयित शाहरुख हा शहरात वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर उपनिरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचत त्याला अटक केली.