धक्कादायक.. नाश्ता वेळेवर न दिल्‍याने सासऱ्याचा सुनेवर गोळीबार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे ; नाश्ता वेळेवर न दिल्‍याने सासऱ्याचा सुनेवर गोळीबार रागाच्या भरात ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणाऱ्या काशीनाथ पाटील (वय वर्ष 76) या सासऱ्याने त्याच्या सुनेची गोळ्या घालून हत्या केली. सीमा राजेंद्र पाटील (वय 42) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर रेती व्यवसायिक असलेले काशीनाथ पाटील फरार झाले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी राबोडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ठाण्यातील राबोड़ी परिसरात राहणारे काशीनाथ पाटील हे रेती व्यवसायिक आहेत. पत्नी, दोन मुले, दोन सुना व नातवंडे अशा आपल्‍या परिवारासह ते राहतात. दरम्यान, काशीनाथ पाटील आणि त्यांची मोठी सून सीमा यांच्यात गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वेळेत नाश्ता दिला नाही या कारणावरून घरगुती किरकोळ वाद झाला.

वेळेत नाश्ता देतो तरी देखील तुम्ही बाहेर जाऊन सुनांची बदनामी करता, असे सीमाने सासऱ्यास उलट उत्तर दिले. याचा राग आल्याने काशीनाथ पाटील याने आपल्या पिस्तूलातून सुनेवर गोळीबार केला. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्या. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान आज (शुक्रवार) पहाटे तिचा मृत्यू झाला. ज्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली तिचा रितसर परवाना आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ सध्या फरार असून राबोड़ी पोलिस त्‍यांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.