धक्कादायक.. किडनी रॅकेटचा पर्दाफाश ; पैशांचे आमिष दाखवत काढली किडनी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे :शहरात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे .कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रूबी हॉल प्रशासनानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षापूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशाची गरज ओळखून रविभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.

या एजंटने तिच्यासमोर पैशाच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्तीला विकण्याचा प्रस्ताव ठेऊन तिला 15 लाख रूपये मिळतील असे आश्वासन दिले. तसेच एका किडनीवरही तु जिवंत राहु शकते असे सांगितले. 15 लाख रूपये मिळणार म्हणून सारिका सुतार हिने देखील किडनी देण्यास होकार दर्शविला. दरम्यान वर्षभरापासून संबंधीत महिला पुण्यात येत होती. तिच्या रक्ताचा गटही किडनी आवशक असलेल्या साळुंके नावाच्या व्यक्तीसोबत जुळला.

किडनीचा हा तोंडी व्यवहार एंजटा मार्फत झाला होता. मात्र, किडनी ही जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. यासाठी सारिका हिला साळुंके या व्यक्तीची पत्नी दर्शविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बनावट बनविण्यात आली. त्यामध्ये सारिका यांचे नाव शोभा साळुंके असे कागदोपत्री करण्यात आले. त्यांनी तसे लेखी संबंधित किडनी प्रत्यारोपन समितीकडेही कबुल केले.

गेल्या आठवड्यात याच कागदपत्राच्या आधारे सारिका हिची किडनी काढून एका किडनी आवशक असलेल्या 19 वर्षीय तरूणीला देण्यात आली. त्या तरूणीच्या आईची किडनी साळुंके यांना बसविण्यात आली. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली

या दरम्यान संबंधित रूग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पीटल मध्ये तिची विचारपूस करण्यासाठी येत- जात होती. एंजटने रूग्णालयात येऊन त्यांची भेट घेतल्याचे सारिका यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिका हिने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का? अशी विचारणा केली.

त्यावर रवीभाऊने केवळ 4 लाख रूपये देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. परंतु, ठरल्या प्रमाणे पंधरा लाख रूपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोंडी व्यवहार फिस्कटला. त्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी यासंबंधी तक्रारही घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सूरू आहे.

किडनी प्रत्यारोपणात गरीब महिलेला पुण्यात आणून तिची किडनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असताना या रवीभाऊने यापूर्वीही अशाप्रकारे किडनी तस्करी केली आहे का, याचाही शोध घेणे महत्वाचे ठरणार आहे.

कोल्हापूर येथील किडनी देणार्‍या महिलेला भेटलेला रवीभाऊ हा पुण्यातील असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्याने रूग्णालयातही येऊन तिची भेट घेतल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याने जर हॉस्पीटलमध्ये संबंधीत महिलेची भेट घेतली असल्यास सीसीटिव्हीमध्ये त्याची छबी टिपली गेल्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.