लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे: वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश . उत्तर प्रदेशातील तरुणींना नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणून हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे – मुंबई रोडवरील आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजवर छापा घालून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
विपुल बाबासाहेब बेलदरे (वय ३६, रा. भैरबा मंदिराशेजारी, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार (वय २४, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजयप्रसाद महतो, केदार मंडल व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल हा हॉटेल मालक तर विक्रम हा व्यवस्थापक आहे. आंबेगाव येथील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. विपुल बेलदरे व विक्रम शोनार हे २० व २१ वर्षांच्या उत्तर प्रदेशातील तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते.
या तरुणींना हिंजवडी येथील कम्पर्ट ईन या हॉटेलमध्ये ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून येथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या तरुणींना उत्तर प्रदेशातून काम देण्याच्या आमिषाने पुण्यात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, कर्मचारी प्रमोद मोहिते, अण्णा माने, इरफान पठाण, पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांच्या पथकाने केली.