लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाणे: सावरकरनगर येथे शिवम ज्वेलर्स हे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी ज्वेलर्स दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या ऋषभ जैन (२५, रा. मुलूंड) या खासगी टॅक्सीचालकाने एक लाख रुपयांची सोनसाखळी जबरीने चोरून पळ काढला होता. मात्र, प्रसंगावधान राखून शैलसिंग चौहान (४८, रा. ठाणे) या ज्वेलर्स व्यावसायिकाने चोरट्यास रंगेहाथ पकडून वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन दिले.
चौहान यांचे सावरकरनगर येथे शिवम ज्वेलर्स हे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दुकान आहे. याच दुकानात २० मार्चला दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास ऋषभ खासगी टॅक्सीचालक सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरला. त्याने एक सोनसाखळी निरखून पाहिली.
त्यानंतर हीच सोनसाखळी हिसकावून त्याने दुकानातून पळ काढला. तो दुचाकीवरून पळून जात असताना चौहान यांच्यासह त्यांच्या मुलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना काही अंतर फरफटत नेले तरीही मोठ्या धाडसाने त्यांनी त्याला पकडले.
त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक करून चोरीतील ही सोनसाखळीही जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले.