अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या गुंडाला महिला पोलिसांचा लाठीप्रसाद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

लातूर: लातूर येथील अल्पवयीन मुलीला मारहाण करणाऱ्या आरोपीला विवेकानंद चौक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली. लाठीप्रसादाने बोळवण करीत त्याची पोलीस ठाण्यापर्यंत पायी वरात काढली. पोलिसांनी गुन्हेगारास दाखविलेला हिसका पाहून नागरिकही सुखावले.

शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात गुन्हेगार दशहत निर्माण करत होता. १४ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीस त्याने फायटरने मारहाण केली होती. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते.

तो ज्ञानेश्वर नगर भागात असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी आरोपीस चालवत ठाण्यात आणले. महिला पोलिसांनी या कारवाईत पुढाकार घेतला होता. पोलिसी खाक्या दाखवताच तो रस्त्यावरच गया वया करु लागला.

तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची अशी अवस्था पोलिसांनी केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक जिलनी मनुल्ला, महिला पोलीस नाईक स्वामी यांच्या पथकाने कारवाई केली.

तक्रार करा, कारवाई करू…

अशाप्रकारे कोणी त्रास देत असेल तर पोलिसांना तात्काळ कळवा. दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.