कोंत्येबोबलाद येथील चौघांवर मोका; एक फरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सांगली

जत ; पूर्व भागातील संघटीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतेच कोंत्येबोबलाद (ता. जत) येथील चौघांना मोका लावण्यात आला आहे. याबाबतचे दोषारोषपत्र न्यायालयात पोलीस उपाधिक्षक रत्नाकर नवले यांनी दाखल केले आहे. हा मोका लावण्यासाठी पोलीस महासंचालक यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर चांगलाच चाप बसणार आहे.

मोका लावण्यात आलेल्या संशयित आरोपी शिवाजी भिवा करे (वय ३२), मारुती लिंबाजी सरगर (वय ३२), पांडुरंग शंकर लोखंडे (वय ३६), श्रीशैल सैदाप्पा कांबळे (वय. ४६, रा. कोंत्येबोबलाद) असे आहेत. या चौघांवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पांडुरंग शंकर लोखंडे हा संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

कोंत्येबोबलाद येथील जगताप नामक एका व्यक्तीला काही महिन्यापूर्वी आर्थिक वादातून कर्नाटकात नेत मारहाण केली होती. यामुळे उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यानुसार घटनेचा तपास सुरू होता.

याच दरम्यान संशयित शिवाजी करे, मारुती सरगर, पांडुरंग लोखंडे, श्रीशैल कांबळे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडे, मारामारी, चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे यासारखे दोन पेक्षा संघटीत प्रकारचे अधिक गुन्हे दाखल होते. गुन्ह्याची तीव्रतामुळे ही गुन्हेगारी रोखण्यासाठी संशयित चौंघावर मोका प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने उमदी व जत उपविभागीय पोलिस कार्यालयास देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार याबाबतचे सर्व पुरावे तपास अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे सादर केले होते. या बाबतची गांभीर्यता लक्षात घेऊन महासंचालकांनी मोका लावण्यास मंजुरी देण्यात आली होती. याबाबतचे दोषारोप पत्र नुकतेच जत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. याकामी उमदी पोलिसांनी देखील महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.