जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लमांजन येथे शेतात गुरे चारून पिकांचे नुकसान करणार्या गुराख्यांसह १४ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील म्हसावद येथील योगेश एकनाथ सोनवणे (वय ४३) यांची लमांजन गावात शेती आहे. ३१ जानेवारी रोजी काही गुराख्यांनी सोनवणे यांच्या शेतात गुरे चरायला सोडली. या गुरांमुळे शेतातील लिंबू व हरभरा या पिकांचे नुकसान झाले. त्याचा जाब विचारला असता संबधितांनी योगेश सोनवणे यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
योगेश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी सुधाकर युवराज पाटील, विठ्ठल वाल्मिक पाटील, अनिल भिमराव पाटील, दीपक मधुकर पाटील, भैय्या भीमराव पाटील, बापू भिमराव पाटील, अशोक रामचंद्र पाटील यांच्यासह इतर ७ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.