धक्कादायक; बापच उठला मुलगी आणि पत्नीच्या जीवावर…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपली मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्ध पित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. प्रभाकर शेट्टी असे हल्ले करणाऱ्या वृद्ध नागरिकाचे नाव असून त्याने पत्नी आणि स्वतःच्या मुलीवर हातोडा आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आरोपी प्रभाकर शेट्टी याला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात बंगला परिसरात राहणारे निवृत्त डॉक्टर असलेले प्रभाकर शेट्टी (७९) हे आपली मुलगी प्रणिता (३८) आंतरजातीय विवाह करत असल्याने नाराज होते. ३० एप्रिल रोजी प्रणिताच्या नियोजित लग्नाला शेट्टी यांनी आक्षेप घेतला होता. विरोधानंतरही मुलीने मनाविरुद्ध जाऊन साखरपुडा केल्यामुळे प्रभाकर शेट्टी आणि त्यांची मुलगी व पत्नी गीता यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर शेट्टी यांच्या नावाचा उल्लेख देखील केला नव्हता.

पहाटे ३.३० वाजता गीता त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना शेट्टीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यानंतर त्याने दोरीचा वापर करून तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या मानेवर आणि छातीवर चाकूने वार केले. या आवाजाने हॉलमध्ये झोपलेली प्रणिता आवाजाने जागी झाली. ती बेडरूममध्ये गेली आणि शेट्टीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या दरम्यान, जखमी झालेल्या पत्नीने आणि मुलीने शेवटी शेट्टी यांचे हात बांधले.

त्यांनी हल्ल्याबद्दल शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर अखेरीस आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत अटक करण्यात आली. सध्या आरोपी वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात असून दोन मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.