विसर्जनासाठी वाहून गेलेल्या तरुणाचा २० दिवसांनी नदीकाठी सापडला मृतदेह
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील निमखेडी शिवारातील रेल्वे पुलाजवळ देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला एक तरुण पाय घसरून गिरणा नदीत वाहून गेला होता. या घटनेला तब्बल २० दिवस उलटून गेल्यानंतर अखेर त्याचा मृतदेह गुरुवारी (दि. २३ ऑक्टोबर) दुपारी दोनगाव शिवारातील गिरणा नदीकाठी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत तरुणाचे नाव हेमेश संतोष पाटील (वय १८, रा. मयुरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर, जळगाव) असे आहे. हेमेश आपल्या आई व जुळ्या भावासह राहत होता. शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) दुपारी साडेअकराच्या सुमारास तो मित्रांसोबत निमखेडी रेल्वे पुलाजवळ देवीमातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. दुपारी सुमारे १२ वाजता विसर्जनाच्या वेळी त्याचा पाय घसरल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले, मात्र हेमेशचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर तब्बल २० दिवसांच्या शोधानंतर गुरुवारी पाळधी जवळील दोनगाव शिवारात गुरे चारणाऱ्या व्यक्तींना नदीकाठी एक मृतदेह दिसून आला. पाळधी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविला.
तेथे कुटुंबीयांनी हेमेशचा मृतदेह ओळखला आणि रुग्णालय परिसरात हृदयद्रावक आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची नोंद पाळधी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.