चाळीसगावात तोतया पोलिसांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेला धमकावून ६ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

0

चाळीसगावात तोतया पोलिसांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेला धमकावून ६ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

चाळीसगाव: शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याचे भासवून एका वृद्ध महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरापूर रोड परिसरात दोन अज्ञात भामट्यांनी एका ६९ वर्षीय वृद्धेच्या हातातील सुमारे ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या बळजबरीने हिसकावून नेल्या. या धाडसी चोरीमुळे चाळीसगाव शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हिरापूर रोडवरील रहिवासी रजनी आनंदा सोनवणे या सोमवारी दुपारी काही कामानिमित्त गावात जाण्यासाठी पायी निघाल्या होत्या. त्या बीज गुणन केंद्राजवळ आल्या असता, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा,” असे सांगून त्यांनी रजनीबाईंचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दागिने काढण्यास नकार दिला असता, या तोतया पोलिसांनी आपले खरे रूप दाखवत त्यांच्या दोन्ही हातातील प्रत्येकी दीड तोळ्याच्या अशा एकूण चार सोन्याच्या बांगड्या बळजबरीने ओरबाडून घेतल्या.

या चोरट्यांनी त्यांच्या बोटातील अंगठी देखील काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रजनीबाईंनी प्रसंगावधान राखून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. लोकांच्या भीतीने आरोपी अंगठी काढण्यात अपयशी ठरले आणि बांगड्या घेऊन घटनास्थळावरून सुसाट पसार झाले. या घटनेनंतर हादरलेल्या रजनी सोनवणे यांनी आपल्या मुलासह पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोतया पोलिसांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.