उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
३९५ लिटर गावठी दारू नष्ट; नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी):
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहर व उपनगरात धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३९५ लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली असून, संबंधित प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध मद्याच्या साखळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. त्याअंतर्गत एका भरारी पथकासह पाच स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली असून, प्रत्येक पथकात दोन अधिकारी व पाच कर्मचारी सहभागी आहेत.
या पथकांनी शहरातील तांबापुरा, कंजरवाडा आणि एमआयडीसी परिसरात छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ६ हजार ५३० रुपये किमतीची ३९५ लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. संबंधित अवैध व्यवसायाशी संबंधित नऊ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अशी कारवाई अखंडपणे सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.