बोगस आयएएस कल्पना भागवतचे नवे कारनामे उघड
पद्मश्रीचे आमिष दाखवून लाखोंची लूट; शिवसेना खासदारासह अनेकांची फसवणूक
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : स्वतःला आयएएस अधिकारी म्हणून सांगत उच्चपदस्थांशी संपर्क असल्याचा दावा करणारी आणि पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचे गोड बोलून अनेकांना जाळ्यात ओढणारी कल्पना भागवत हिचा आणखी एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्यासह अनेकांकडून तिने लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक आरोप पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे.
सविस्तर माहितीनुसार, दत्तात्रय शेटे आणि मनोज लोढा यांनी तिला पद्मश्री पुरस्काराची हमी देण्याच्या आमिषाला बळी पडत तब्बल ७ लाख ८५ हजार रुपये दिले, तर रमेश मुले यांनीही सुमारे सव्वादोन लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. इतकेच नाही, तर गेल्या अकरा महिन्यांत कल्पना भागवत हिच्या बँक खात्यात तब्बल ३२ लाख ६८ हजार ८३२ रुपये जमा झाल्याचा पोलिसांना मिळालेले आकडेवारीनुसार खुलासा झाला आहे. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनीही १ लाख ४५ हजार रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिडको पोलीस ठाण्यात २२ नोव्हेंबर रोजी तिच्याविरुद्ध बोगस आयएएस बनून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील घर असूनही ती गेल्या सहा महिन्यांपासून पंचतारांकित अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याचेही पुढे आले. त्यानंतर शहर पोलीस, एटीएस, आयबी आणि सीआयडी या विविध पथकांनी केलेल्या चौकशीत तिचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन असल्याचे गंभीर उघड झाले.
या तपासातून पुढे येत तिचा अफगाणिस्तानमधील मित्र मोहम्मद अशरफ खिल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोतया ओएसडी असल्याचे भासवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई या दोघांना दिल्लीहून अटक करण्यात आली. न्यायालयाने कल्पनाला ६ डिसेंबरपर्यंत, तर अशरफ आणि डिम्पी यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या सिडको पोलीस ठाण्यात तिघांची वेगवेगळी चौकशी सुरू असून, विशेष म्हणजे कल्पनाला तिचे दोन्ही साथीदार अटकेत असल्याची माहिती अद्याप दिलेली नाही.