अब्बास आफ्रिदीचा तुफानी हल्ला! फक्त १२ चेंडूत ५५ धावा…. !

0

अब्बास आफ्रिदीचा तुफानी हल्ला! फक्त १२ चेंडूत ५५ धावा…. !

एका षटकात ठोकले सहा षटकार ; अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय

हाँगकाँग वृत्तसंस्था हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेला धमाकेदार सुरुवात झाली असून, पावसामुळे पहिले दोन सामने रद्द झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने अक्षरशः फटाकेबाजी करत मैदान गाजवले. कुवेतविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदी याने केवळ १२ चेंडूत ५५ नाबाद धावा ठोकत एकट्याने सामना पलटवला. त्याच्या तुफानी खेळीसह पाकिस्तानने अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कुवेतने अवघ्या सहा षटकांत दोन गडी गमावत तब्बल १२३ धावा फटकावल्या. सलामीवीर मीत भावसारने १४ चेंडूत नाबाद ४० धावा ठोकल्या, तर उस्मान पटेलने ९ चेंडूत ३१ धावा झळकावल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांना सुरुवातीला नियंत्रण मिळवण्यात अडचण आली.

पाकिस्तानचा डाव सुरुवातीला डळमळीत झाला होता. ख्वाजा नफेने ११ चेंडूत २५ धावा केल्या, तर मोहम्मद शहजादने ८ चेंडूत १४ धावा काढल्या, पण दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला. अब्दुल समद शून्यावर बाद झाल्याने संघावर संकट ओढावले. चार षटकांत संघाचा स्कोअर फक्त ५७ धावांवर असताना विजय जवळपास अशक्य वाटत होता.

पण त्याच क्षणी अब्बास आफ्रिदी मैदानात उतरला आणि सामन्याचे चित्रच पालटले. त्याने पाचव्या षटकात एकहाती फटकेबाजी करत सलग सहा षटकारांसह तब्बल ३८ धावा काढल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात त्याने पुन्हा चार षटकार आणि एक चौकार फटकावत विजय पाकिस्तानच्या झोळीत टाकला. त्याला शाहिद अझीझने ५ चेंडूत २३ नाबाद धावांची साथ दिली.

अब्बासच्या या वादळी खेळीसह पाकिस्तानने चार विकेट्सने विजय मिळवून स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले.

दरम्यान, स्पर्धेतील पुढील सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १:०५ वाजता (भारतीय वेळेनुसार) रंगणार असून, या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताचा पुढील सामना ८ नोव्हेंबरला सकाळी ६:४० वाजता कुवेतविरुद्ध होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवतील, त्यानंतर नॉकआउट फेरी सुरू होईल.

स्पर्धेतील गटसंरचना पुढीलप्रमाणे आहे —
पूल A: दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळ
पूल B: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएई
पूल C: भारत, पाकिस्तान, कुवेत
पूल D: श्रीलंका, बांग्लादेश, हाँगकाँग

Leave A Reply

Your email address will not be published.