अमळनेर : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाचा वाद डोक्यात ठेवून बहिणीच्या घराला आग लावणाऱ्याला तरुणाला अमळनेर न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
चाळीसगावातील मोरया नगरमधील देवेंद्र पांडुरंग पाटील याचे बहिण व पाहुण्यांसोबत वाद झाले होते. पोलीस ठाण्यात हे वाद मिटवण्यात आले होते. परंतु, हा वाद डोक्यात ठेवून देवेंद्र पाटील याने चोपड्यातील पाटील गढीत राहणारे बहिणीचे सासरे युवराज आधार पाटील यांना तुझ्या पोरांना समजावून सांगा, अशी धमकी दिली. तसेच पाहुणे प्रशांत पाटील यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती. तसेच तुमचे घर जाळून टाकेल, अशी ही धमकी देऊन बहिण व भाचीलाघे ऊन चाळीसगावला निघून गेला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास युवराज पाटील घरात झोपलेले असताना घराच्या पहिल्या गॅलरीतून प्रवेश करुन घरातील लाकडी दरवाजा, पडदे, गॅस सिलिंडरवर डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. यात घर जळल्याने मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, नोडल अधिकारी, आरोपीचे लोकेशन शोधणारे अधिकारी व शेजारील रहिवासी, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांची साक्ष महत्वाची ठरवली. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपीस भादवी कलम ४३६मध्ये सहा वर्षे कारावास) व ५०० रुपये दंड. तसेच दंड न भरल्यास १५ दिवस कारावास. भादवी कलम ४४८मध्ये २ महिने शिक्षा व १०० रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस शिक्षा. तसेच भादवी कलम ४२७मध्ये १ महिने कारावास व भादवी कलम ४३२मध्ये ३ महिने शिक्षा व १०० रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला. तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे, हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे, अतुल पाटील, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.