कोरोनाची कॉलर ट्यून लवकरच होणार बंद; केंद्र सरकार जारी करू शकते निर्णय

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन अडीच वर्षांपासून भारतासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती करून जनतेला सतर्क करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली गेली.

तसेच प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत.

या कोरोना कॉलर ट्यूनने गेल्या दोन वर्षांपासून लोकांचा पाठलाग सोडलेला नाही. मात्र आता लवकरच तुमची या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो.

याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने (DoT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (CoA) तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर, ही ‘कॉलर ट्यून’ दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. दूरसंचार सेवेने (TSPs) लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी, तसेच साथीच्या आजारादरम्यान घ्यावयाच्या खबरदारी आणि लसीकरणांबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी कॉल करण्यापूर्वी कोरोना व्हायरसशी संबंधित कॉलर ट्यून ऐकवली जात होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.