शिंदे गटातील आमदारांच्या आगामी राजकीय प्रवासाची वाट खडतर..!

0

लोकशाही कव्हर स्टोरी 

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) शिवसेनेचे (Shivsena) चार आणि एक अपक्ष, पण तेही शिवसेनेचे सहयोगी सदस्य असे पाच आमदार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) बंडात सामील झाले. सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati) आणि गोव्याच्या (Goa) प्रदीर्घ वास्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघात ते पोहोचले. त्याआधी मतदार संघात आणि जिल्ह्यात शिवसेनेकडून तीव्र असंतोष व्यक्त झाला. मतदार संघातील आगमनानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत होईल, ही त्यांची अपेक्षा होती.

पण मुक्ताईनगर (Muktainagar) वगळता इतर समर्थक कार्यकर्त्यांच्या समर्थनाशिवाय विशेष स्वागत झाले नाही. त्यानंतर आमदारांनी याबाबत स्वतः आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, आणि करीत आहेत. याला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ मात्र अपवाद असून, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांच्या (MLA Chandrakant Patil)  मुक्ताईनगर येथील भव्य मिरवणूक आणि जल्लोषामागे विशेष अशी पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) यांना शह देण्याचा इर्षेतून हा जल्लोष झाला. त्यामागे भाजपची (BJP) शक्ती आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारातील आपापसातील वाद चव्हाट्यावर आले. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतरही हे वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते आणखी उफळणार. म्हणून या सर्वच आमदारांचा आगामी राजकीय प्रवास त्यांच्यासाठी सोपा राहणार नाही.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतून बंड केलेले, त्यांच्या दृष्टीने उठाव केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former BJP Chief Minister Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड आणि मुख्यमंत्री शिंदे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मंजूर झाला. एक आठवडा उलटला, अद्याप शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, गटनेता आणि प्रतोद पदाचा प्रश्न कोर्टात असल्याने त्याचा लागणारा निकालही लांबला. तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या लांबलेल्या निर्णयाचा फायदा कोणाला मिळेल ? हे आजही सांगणे अवघड आहे. तथापि शिवसेनेचे हे सर्व बंडखोर आमदार महिनाभरापूर्वी शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बेंबीच्या देठापासून ओरडून गुणगान गात होते. पाच जून रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. तिथे शिवसेना प्रमुखांवर स्तुती सुमने वाहणारी भाषणे ऐकली गेली.

दस्तूर खुद्द गुलाबराव पाटील यांचेही जोशपूर्ण भाषण झाले. तथापि त्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणातून साधा उल्लेखही शिंदे यांच्या बंडाचा झाला नाही. साधी पुछटशी हिंट सुद्धा कुणाच्या भाषणातून दिसली नाही. त्यामुळे शिंदेंचे बंड पूर्वनियोजित होते, वर्ष सहा महिन्यापासून हे शिजत होते, असे आता सांगत असलेले हे सर्व आमदार आपल्या मतदारसंघातील मतदारांना तसेच शिवसैनिकांना अंधारात ठेवण्याचे कारण काय ? आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांना पुसटशी कल्पना देऊन त्यांच्याजवळ आपला रोष व्यक्त केला असता, तर शिंदे गटाच्या बंडा नंतर मतदार संघातील शिवसैनिक, जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी या सर्व आमदारांना डोक्यावर घेतले असते. मतदार संघातील शिवसैनिकांना अंधारात ठेवून स्वतः एकट्याने हा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे शिवसैनिक शिवसैनिकांत असंतोष पसरला. याच भावनेतून जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आक्रोश मोर्चात उत्स्फूर्त सहभागी होऊन आपला आक्रोश व्यक्त केला. परंतु यामागे खासदार संजय राऊत यांचा हात असल्याचे सांगून संजय राऊत यांचे पुतळे जाळण्याचा काही ठिकाणी प्रयत्न झाला. जशास तसे उत्तर आम्ही देऊ शकतो, हे यातून त्यांनी दाखवून दिले.

आजही जिल्ह्यातील तीनही शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. एकही जिल्हाप्रमुखांनी बंडखोर आमदारांचे समर्थन केले नाही. त्यातच जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, सहसंपर्कप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरसेवक बहुसंख्येने उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खरे शिवसैनिकांनी अद्याप उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही; ते सोडण्याची शक्यता नाही. अखेर राजकारणात काहीही होऊ शकते. परंतु आजही हे शिवसैनिक शिवसेनेबरोबरच आहेत. आगामी काळात नवीन शिवसैनिकांना संधी मिळणार असल्याने ते आपल्या मतावर ठाम राहतील, असे आज तरी स्पष्ट दिसते.

दरम्यानच्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराची हे आमदार वाट पाहत आहेत. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांची भूमिका कशी असेल हे कळेलच. परंतु पारोळ्याचे शिवसेनेचे जेष्ठ आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. गुलाबराव पाटलांविषयी नुकतेच एका शिवसैनिकांशी चिमणराव पाटलांनी केलेल्या संवादाची जिल्हाभर जोरदार चर्चा झाली. गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील  शिवसेना संपवली असा घणाघाती हल्ला चिमणराव पाटलांनी केला. त्यामुळे त्यांच्यात असलेला मतभेद चव्हाट्यावर आलेला आहे. शिंदे मंत्री मंडळात गुलाबराव पाटील मंत्री होणार अशी चर्चा आहे. ते मंत्री झाले तर गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील मतभेद क्षमण्याऐवजी आणखी वाढत जातील. परंतु आज तरी सर्वच बंडखोर आमदार आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेवर आहेत. प्रत्येक बंडखोर आमदाराविषयी जी टीकाटिप्पणी होते त्यावरून आगामी काळातील त्यांच्या राजकीय प्रवास सुखकर होण्याऐवजी खडतर राहील असे दिसून येते.

गुलाबराव विरुद्ध गुलाबराव

जळगाव ग्रामीण मतदार संघातून त्याआधी एरंडोल मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून मावळते पालकमंत्री गुलाबराव पाटील हे चार वेळा निवडून आलेले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव पाटलांचा पराभव केला होता. तेव्हा गुलाबराव देवकर हे दोन अडीच वर्षे पालक मंत्री होते, आणि पालकमंत्री म्हणून गुलाबराव देवकऱ्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या काळात झालेली मतदारसंघातील विकास कामांची आजही मतदारसंघात चर्चा होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढता आली नाही; परंतु 2024 च्या निवडणुकीत देवकरांचे तगडे आव्हान गुलाबराव पाटलांसमोर राहणार आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी असलेले सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांची उमेदवारी आता शिवसेनेने घोषित केलेली आहे. गुलाबराव वाघ हे गुलाबराव पाटलांचे कट्टर समर्थक होते. गुलाबराव हे माळी समाजाचे आहेत. अशात धरणगावात फार मोठा माळी समाज आहे. तसेच वाघ हे सुद्धा कट्टर शिवसैनिक असल्याने ते जर निवडणुकीत उभे राहतील तर गुलाबराव पाटलांसमोर मोठे आव्हान राहील. त्यामुळे गुलाबराव पाटलांसाठी आगामी 2024 ची निवडणूक सोपी राहणार नाही.

किशोर पाटीलविरूध्द अमोल शिंदे

पाचोरा – भडगाव मतदार संघातून किशोरअप्पा पाटील हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 च्या निवडणुकीपेक्षा 2016 ची निवडणूक किशोरअप्पांसाठी अवघड ठरलेली आहे. अवघी 1100-1200 मते अपक्ष उमेदवार अमोल शिंदेला पडली असती, तर आज अपक्ष आमदारांच्या यादीत अमोल शिंदे नाव असते. त्यातच भडगाव तालुक्यात किशोरअप्पांचे मताधिक्य घटले आहे. आजही भडगाव तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांकडून जो प्रतिसाद मिळायला पाहिजे तो किशोरअप्पांना मिळत नाही, ही वस्तुस्थिती म्हणावी लागेल. किशोरअप्पांच्या बंडखोरीनंतर भडगावच्या शिवसैनिकांनी रक्ताच्या शाहीने उध्दव ठाकरेंना पत्र लिहून उध्दव ठाकरेंवरील आपली निष्ठा व्यक्त केली. त्यातच आगामी 2024 च्या निवडणुकीत अमोल शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार राहणशर असल्याने किशोरअप्पांना त्यांचे कडवे आव्हान राहणार आहे. पाचोऱ्यात अमोल शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे – फडणवीसांचे सरकार स्थापनेनंतर जो जल्लोष केला त्यातून भाजपने तालुक्यातील शक्तीप्रदर्शन सिध्द केले. त्यामुळे किशोरअप्पांना आगामी 2024 ची निवडणूक लढतांना नाकीनऊ येतील, यात शंका नाही. त्यासाठी शिंदे मंत्रीमंडळात समावेश व्हावा म्हणून किशोरअप्पांचे समर्थक देवासमोर आरती करीत आहेत. मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांच्या समोरील प्रश्न सुटेल, असे आज तरी वाटत नाही.

चिमणराव विरूध्द सतीशअण्णा

पारोळा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. तथापि पारोळा मतदारसंघात चिमणराव पाटील विरूध्द राष्ट्रवादीचे डॉ.सतीश पाटील यांचेतील राजकीय नाते सर्वांना माहित आहे. या मतदार संघात एकदा चिमणराव पाटील निवडून आले तर दुसऱ्यांदा सतीश पाटील हे निवडून येतात असा इतिहास आहे. तथापि 2019 मात्र त्याला अपवाद ठरला आणि तालुक्यातील राजकारण त्यांना भोवले. 2019 च्या निवडणुकीत सतीश पाटलांचा पराभव झाला. त्यामुळे डॉ. सतीश पाटील यांचे 2024 साठी चिमणरावांना मोठे आव्हान राहणार आहे. त्यातच चिमणरावांच्या बंडखोरीनंतर एरंडोल – पारोळा तालुक्यातील शिवसैनिकात प्रचंड असंतोष पसरला आहे. चिमणआबांना दोन्ही तालुक्यात शिवसैनिक फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यातच चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटलांतील राजकीय वैमनस्य कुणाचा तरी बळी घेणार, यात शंका नाही. जिल्हा शिवसेनाप्रमुख डॉ. हर्षल माने हे सुरूवातीपासूनच आ. चिमणराव पाटलांचे विरोधक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्व आव्हाने चिमणरावांसमोर असतील.

चंद्रकांत पाटलांना भाजपाच भोवणार

मुक्ताईनगर – बोदवड विधानसभा मतदार संघातून आ. चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून अगदी काठावरच्या मतांनी विजयी झाले. भाजप- शिवसेनेची युती असल्यामुळे जिल्हा शिवसैनिक प्रमुख असलेल्या चंद्रकांत पाटलांना सेनेतर्फे उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढविली. युती असल्यामुळे जिल्हा शिवसैनिक प्रमुख असलेल्या चंद्रकांत पाटलांना सेनेतर्फे उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढविली. भाजपला शह देण्यासाठी राजकीय डावपेच म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अपक्ष चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी आमदारकीचा भरलेला अर्ज मागे घेऊन अधिकृतपणे चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला. काँग्रेस- राष्ट्रवादीची युती असल्याने तसेच काँग्रेसवाल्यांचा खडसेंवर रोश असल्याने एकदिलाने त्यांनी चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला. शिवसेनेचा छुपा नव्हे तर उघड पाठिंबाच होता. तसेच भाजपचा छुपा पाठिंबा होता. त्यामुळे एवढ्या सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे पाटील हे काठावर विजयी झाले. आता चंद्रकांत पाटलांना तालुक्यातील भाजप समर्थन करते आहे. मुक्ताईनगरची जागा चंद्रकांत  पाटलांना लढवायची असेल तर, त्यांना भाजपमध्येच प्रवेश करावा लागेल. परंतु चंद्रकांत पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुक्ताईनगर मतदार संघातील भाजपवाल्यांचे ते पचनी पडेल काय ? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चंद्रकांत पाटलांसाठी सुखकर राहील असे वाटत नाही.

सोनवणे विरूध्द चोपडेकर

चोपडा विधानसभा मतदार संघातून प्रा. चंद्रकांत सोनवणे 2014 साली आणि 2019 साली त्यांच्या पत्नी लताबाई सोनवणे या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या. चोपडा तालुक्यातील जनतेचा आ. लताताई सोनवणेंवर प्रचंड रोश आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जुने शिवसैनिक सेनेतून बाहेर पडले. बाहेरचा उमेदवार चोपडेकरांवर लादला म्हणून चोपड्याची जनता नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षात आमदाराविषयी नाराजी आहे. त्यामुळे आगामी निवडणूक लताताई सोनवणे व चंद्रकांत सोनवणेंसाठी सोपी नाही.

– धों. ज. गुरव 

सल्लागार संपादक 

दै. लोकशाही, जळगाव

 

Leave A Reply

Your email address will not be published.