कोर्टाचा आदेश; राम बालकदास महाराज आणि ६ जणांवर गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील शाहु नगर येथील तपस्वी हनुमान मंदिरातील राम बालकदास महाराजांसह सहा जणांविरुध्द महिलेचा विनयभंग, चोरी तसेच कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम बालकदास महाराज, सागर संजय पोळ, गोलू तुकाराम रणसिंघे, गौरव युवराज डांबे, प्रवीण पांडुरंग निंबाळकर रा.शाहुनगर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २ मे रोजी महिला दिराणीसोबत मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. पूजा झाल्यानंतर महिलेची दिराणी मंदिराबाहेर गेली. मंदिरात पिडीत महिला एकटीच असताना राम बालकदास यांनी महिलेला लज्जास्पद वाटेल, असे कृत्य करुन विनयभंग केला. आरडाओरड करत महिला मंदिराबाहेर पळाली.

या प्रकरणात त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन महाराजाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसांनी नोंदवून घेतला. राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात बोलवून नंतर सोडून दिले. त्यानंतर दाखल तक्रार मागे घेण्यासाठी रात्री १०.३० च्या सुमारास महाराजांसह सहा जणांनी पिडीतेच्या घरावर हल्ला केला. त्यांच्याजवळ तलवार, चॉपर सारखे धारदार शस्त्र होते.

पती व दिरासह त्यांनी त्यांच्या चालकालाही मारहाण केली. त्यानंतरही तक्रार देण्यासाठी ती महिला जात असताना महिलेचा व तिच्या दिराणीचा हात धरुन ठेवला. त्यांच्यापैकी कुणीतरी गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने काढून घेतले. पती व दिराने त्यांची सुटका केली. चालकाला शहर पोलिसांनी मेमो देवून उपचारासाठी पाठविले. शहर पोलिसांनी त्या महिलेची फिर्याद नोंदवून घेतली नाही. नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी संजय बडगुजर यांनी त्या महिलेच्या पतीकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी बडगुजर यांनी शांतता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावेळी महिलेच्या दिराने Online phone pay करत पोलिस कर्मचाऱ्याला 1 हजार रुपये वळते केले. परंतु तक्रार नोंदविली नाही. महिलेने पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकाऱ्यांनाही तक्रार अर्ज दिला. त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे महिलेने 17 मे रोजी न्यायालयात खासगी खटला दाखल केला,असे फिर्यादीत नमूद आहे. त्यात न्यायालयाने महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.