मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
घाटकोपरमध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह बाथरूममध्ये आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गीझर गॅस लीकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घाटकोपरमध्ये कुकरेजा टॉवरमध्ये दीपक शाह आणि टीना शाह हे भाड्याने राहत होते. बाथरूममध्ये लावलेल्या गीझरचा गॅस लीक होऊन त्यांचा श्वास गुदमरला. यात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान शाह यांच्या घरी कामासाठी येणाऱ्या महिलेनं बेल वाजवली. मात्र कुणीही दरवाजा न उघडल्यानं पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यानंतर दोघेही बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
गीझर गॅस लीक झाल्यास स्फोटाची शक्यता असते. तर इलेक्ट्रिक गीझर असेल तर त्यात बॉयलर फुटण्याची शक्यता असते. बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्यास श्वास गुदमरतो. त्यामुळे व्हेंटिलेशन नीट नसल्यास योग्य ती काळजी घ्या आणि वेळोवेळी गीझर गॅस व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी करून घ्या. गेल्या काही दिवसात गीझर गॅस लीक झाल्यानं मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्यास आणि गरम पाणी बादलीत भरत असताना दरवाजा बंद असेल तर श्वास गुदमरण्याची शक्यता असते.