लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजविला आहे. याचा प्रभाव राज्यातील अनेक भागात होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर वादळाच्या प्रभावाने शेतकरी संकटात सापडला आहे. प्रामुख्याने भातशेती धोक्यात सापडली असून कापूस व तुरीच्या पिकाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण भारतात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या आहेत. यामुळे धानाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापलेले धान शेतात रचून ठेवले जातात. संपूर्ण भात पट्ट्यात हीच पद्धत आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी धान ओला झाला आहे. त्यामुळे भाताच्या प्रतवारीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
भिजलेल्या धानाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. तर दुसरीकडे कापूस, तूर, हरभरा ही पिकेसुद्धा शेतात आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट आले. तुरीला फुलोरा आला आहे. पावसामुळे हा फुलोरा प्रभावित होऊ शकतो. अळीचा धोकाही यामुळे वाढला आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने कापूस शेतात उभा आहे. त्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा, यामुळे कापूसही दर्जाहीन होण्याची शक्यता आहे.