सीसीआय सॉफ्टवेअर तांत्रिक बिघाडामुळे कापूस खरेदी ठप्प

६८ केंद्रावर खरेदी थांबल्याने शेतकरी खोळंबले

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकारने कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद सुरु केले आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांना खासगी व्यापारी देत असलेल्या दरापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र या सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी कापूस खरेदी थांबली असून विदर्भातील ६८ केंद्रावर कापूस खरेदी ठप्प झाली आहे.

यंदा कापसाला चांगला दर मिळेल या आशेने कापूस लागवड वाढली होती. मात्र जास्त पाऊस झाल्याचा परिणाम कापूस पीक व उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट आली असून घरात कापूस आल्यानंतर कापसाला देखील चांगला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला. दरम्यान केंद्र सरकारने कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरु केले असून याठिकाणी शेतकऱ्यांना ७ हजार ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

सीसीआयच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी विदर्भातील ६८ केंद्रावरील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने कापसाच्या सीसीआयची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस खरेदीला प्रति क्विंटल ७ हजार ४२१ रुपये इतका भाव देण्यात येत आहे. मात्र सीसिआयचे कापूस केंद्र बंद पडल्याने व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात भाव पाडले आहे. खुल्या बाजारात कापसाला ६ हजार ९०० ते ७ हजार रुपयांपर्यन्त दर आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल कापसामागे ४०० ते ५०० रुपयाचे नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.