पुन्हा एकदा भारतावर कोरोनाचं संकट ? आरोग्यमंत्र्यांनी जारी केले नवे निर्देश

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले आहे. तर मागील महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

याच पार्श्वभूमीवर देशातील निर्बंध ही शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान त्यातच एक चिंतादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी यासंदर्भातली माहिती दिली. काही युरोपियन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना उच्च पातळीची दक्षता आणि निगराणी ठेवण्यासाठी आणि आक्रमकपणे जीनोम सिक्वेन्सिंगचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या उच्चस्तरीय बैठकीत 27 मार्चपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय, लसीकरण स्थिती आणि जीनोमिक पाळत ठेवण्याच्या पातळीचा आढावा घेण्यात आला. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमधील वाढत्या केसेस पाहता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली असल्याचं एका अधिकृत सूत्राने सांगितलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी आक्रमक जीनोमिक सिक्वेन्सिंग, उच्च पाळत ठेवणं आणि उच्च पातळीची दक्षता घेण्याचे निर्देश दिले असल्याचं सूत्रानं सांगितलं. आरोग्य सचिव राजेश भूषण, जैवतंत्रज्ञान सचिव डॉ राजेश गोखले, औषधनिर्माण विभागाचे सचिव एस अपर्णा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया आणि NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.