सततच्या पावसामुळे साकळी परिसरात शेतातील मक्याला फुटले कोंब!

बळीराजा चिंतेत : सर्वच खरीप पिके धोक्यात

0

 

मनवेल ता. यावल

साकळीसह मनवेल, थोरगव्हाण पथराडे शिवारात परिसरात पावसाळा संपल्यानंतरही गेल्या महिन्याभरापासून अधून-मधून अवकाळी पाऊस जोरदारपणे हजेरी लावत असल्याने परिसरातील शेतांमधील सर्वच काढणीला आलेली खरीप पिके खराब होत असून खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतात मोडून जमिनीवर ठेवलेल्या मक्याच्या कणिसाला आता हिरवे कोंब फुटायला सुरुवात झालेली असल्याने शेतकऱ्याच्या हाता- तोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर आहे. एकूणच अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे खचलेला असून सर्वच पिकांच्या नुकसानीमुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. तरी या आसमानी संकटाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे.

याबाबत सविस्तर असे की, गेल्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मोसमी पाऊस परतत असतांना या अगदी शेवटी शेवटी या पावसाने सतत जोरदारपणे हजेरी लावत साकळी सह परिसराला ओलेचिंब करून टाकले होते. सर्वत्र धो-धो पाऊस कोसळला होता. या कोसळधार पावसातही परिसरातील खरीप पिके कशीबशी उभी राहिली. या पावसामुळे उन्हाळी लागवडीच्या कपाशीचे नुकसान झाले. तरीही हे नुकसान सहन करीत पावसाळा संपल्यानंतर शेतातील पीक पाणी चांगले येईल या शेतकरी आशेवर जगत राहिला. मात्र मोसमी पाऊस संपून जवळपास महिना होऊन गेला मात्र त्यानंतरच्या काळात सतत पडणारा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

 

सध्याच्या ऑक्टोबर महिन्यात पावसाने अधून- मधून जोरदार हजेरी लावत काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान करीत आहे. आगात लागवडीच्या कपाशीला आता मोठ्या प्रमाणात कपाशी फुटत आहे. तर मक्याचे पीक तयार झालेले असून काढणीला आलेले आहे तर ज्वारी सह इतर पीकही काढणीला आलेले आहे. मात्र पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत बनलेला आहे. कपाशीचे बोंडे ओले होऊन कपाशीला ही झाडावरच कोंब फुटायला सुरुवात झालेली असून कपाशी खराब होत आहे त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे तर पावसाळी कपाशी अति पावसामुळे वाढत नसल्याने तिला जेमतेम कैऱ्या लागत असल्याने हे कपाशीचे पीक पुर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

त्याचप्रमाणे साधारणतः तीन वर्षापूर्वी सततच्या पावसामुळे सर्व दूर मका पिकाला कोंब फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती यंदाच्या वर्षी निर्माण झाली आहे. साकळी परिसरातील काढून ठेवलेल्या मक्याच्या कणीसाला सततच्या पावसामुळे कोंब फुटायला सुरुवात झालेली आहे. पाऊस एवढा जोराचा येतो की शेतामधून अक्षरशः पाणी वाहून निघत असल्याने पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. काढणीला आलेले पिके काढायला पाऊस उसंत देत नसल्यामुळे आता काय करावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावित आहे.

 

सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढलेली असून शेतकरी मोठ्या प्रमाणात धास्तावले आहे. या पावसामुळे यंदाच्या वर्षीचा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घट येणार असून परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आस्मानी संकटात आहे. खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज या अस्मानी संकटामुळे कसे फेडायचे, घेतलेली हात उसनेवारी कशी फेडायची व संसाराचा प्रपंच कसा चालवायचा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे आहे. तरी शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने त्वरीत लक्ष देऊन शेतकऱ्याला आर्थिक आधार द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

त्याचप्रमाणे निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेल्या सर्वच छोट्या-मोठ्या पुढाऱ्यांनी थोडा काही वेळ काढून शेतकऱ्यांच्या अडचणी कडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात जेव्हा शासन- प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून आधार मिळेल तेव्हाच हा शेतकरीराजा पुन्हा एकदा उभा राहिल. तसेच यापुढील काळात पाऊस थांबला नाही तर खरीप हंगाम पुरता गेलेला असेल. त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आशा असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.