मुख्यमंत्र्यांच्या होमपिचवर वादाचा सामना!
भाजपचा आमदार असताना शिवसेनेचा दावा : निर्णयाकडे लागले लक्ष
ठाणे
महायुतीच्या विधानसभा जागावाटपात अडचणीचा ठरणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या ठाणे शहर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे वादाची ठिणगी पडली. या मतदारसंघाचे भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडून दहा वर्षांत भरीव कामगिरी झालेली नाही, असे मत व्यक्त करत हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडवा, अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली.
ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगतानाच शिंदे यांनी भाजपच्या अंतर्गत गटबाजीवरही बोट ठेवले. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहर मतदारसंघावरुन महायुतीतच आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ठाणे जिल्ह्याची ओळख असली तरी गेल्या दहा वर्षांपासून येथील ठाणे शहर मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकत आहे. 2014मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये संजय केळकर यांनी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा पराभव या मतदारसंघात कमळ फुलवले. त्यानंतर 2019मध्ये झालेल्या निवडणुकीत केळकरांनी मनसेच्या अविनाश जाधव यांनाही पराभवाची धूळ चारली.
या मतदारसंघावर शिवसेनेचे सुरुवातीपासून लक्ष आहे. त्यातच नुकतीच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी थेट भाजपने ठाणे शहर मतदारसंघाची जागा सोडावी, अशी इच्छा व्यक्त केली. भाजप आमदार संजय केळकर हे सर्वप्रथम येथील दहा हजार आणि दुसऱ्यांदा 15 हजारांच्या मताधियाने निवडून आले. मात्र विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांना लोकसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून 48 हजारांचे मताधिय होते. त्यामुळे या मतदारसंघावरील आमचा दावा उचित असल्याचेही मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.