जिल्हा बँकेची दगडी इमारत विक्री वादाच्या भोवऱ्यात..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेला 108 वर्षे झाली आहेत. एवढी जुनी बँक गेल्या शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून शेतकऱ्यांची बँक म्हणून नावाजलेली आहे. गेल्या 108 वर्षांमध्ये बँकेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. प्रल्हादराव पाटील, सुरेश दादा जैन, ओंकार आप्पा वाघ, ईश्वरलालजी जैन, रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर आदी बँकेचे चेअरमन राहिले आहेत. आता संजय पवार हे चेअरमन आहेत. शहरामध्ये जिल्हा बँकेच्या दगडी इमारतीत मुख्य कार्यालय होते. स्थापनेपासून ते गेल्या 30-35 वर्षांपूर्वी रिंग रोडवर जिल्हा बँकेची नवीन इमारत तयार होईपर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय ही दगडी बँक होती. जिल्हा बँकेची दगडी इमारत म्हणून ती नावारूपाला आली होती. अशा दगडी इमारतीत सध्या बँकेची शाखा कार्यरत आहे. सुमारे 6500 चौरस फूट या दगडी इमारतीचे क्षेत्रफळ आहे. बँकेच्या नवीन इमारतीत मुख्य कार्यालय कार्यरत असल्यामुळे आणि दगडी इमारत आता खिळखिळी झाली असल्याने त्या दगडी इमारतीची जागा विक्री करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. हा सर्व विक्री व्यवहार पारदर्शकपणे करून आलेल्या पैशातून जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांच्या दुरुस्तीवर खर्च करून शाखा अपडेट करण्यात येईल, असे बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकारांना सांगितले. बँकेच्या सर्व संचालकांनी या ठरावाला एकमुखी मान्यता दिली असली, तरी बँकेचे एक ज्येष्ठ संचालक माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या दगडी बँकेच्या विक्रीला विरोध दर्शवला आहे. गुरुवारी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला एकनाथ खडसे हे त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे हजर राहू शकले नाहीत. परंतु एकनाथ खडसे यांनी चेअरमनला फोन करून दगडी बँक विक्री ठरवायला विरोध असल्याचे सांगितले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी चेअरमन संजय पवार यांना स्वतंत्रपणे लेखी पत्र देऊन दगडी बँकेशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. जिल्हा बँकेची दगडी इमारत हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. तिला जपून ठेवले पाहिजे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती इतकी वाईट नाही की त्या दगडी बँकेच्या विक्रीतून एनपीए कमी करता येईल. एकनाथ खडसेंच्या विरोधामुळे दगडी बँकेची इमारत विक्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा दगडी बँक विक्रीचा प्रस्ताव बँकेने मागे घ्यावा, अशी विनंती सुद्धा एकनाथ खडसे यांनी केली असून जर विक्रीचा प्रस्ताव मागे घेतला नाही, तर दगडी बँक बचाव असे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे दगडी बँक इमारत विक्रीला वेगळेच वळण मिळाले आहे..

जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने शहरातील सर्वात जुनी दगडी बँक इमारतीचा विक्रीचा प्रस्ताव अजून मंजूर केल्यानंतर आणि त्याला संचालक एकनाथ खडसे यांनी विरोध दर्शवल्यानंतर बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दगडी बँक विक्रीचा संचालक मंडळाने केलेला प्रस्ताव कसा योग्य आहे, अशी आपली व बँकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ खडसेंच्या मूळ विरोधाला उत्तर न देता वेगळ्याच पद्धतीने बँकेने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे समजावून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खडसे म्हणतात दगडी बँकेशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. दगडी बँकेची थोडी बहुत दुरुस्ती करून तो एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपावा, असे स्वतः खडसे व शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा त्याला उत्तर देताना जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सहकार महर्षी जे. टी. महाजन यांनी रक्ताचं पाणी करून यावलला सूतगिरणी उभारली. पण ती विकली गेली. मधुकर सहकारी साखर कारखाना कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांसाठी उभा केला. परंतु तो खाजगीच व्यक्तीला विकला गेला. चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना, रावेरचा कारखाना आदी विकले गेले, तेव्हा शेतकऱ्यांच्या तसेच एकनाथ खडसे यांच्या भावना कुठे गेल्या होत्या? जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा हा खडसेंवरील आरोप संयुक्तिक नाही. कारण जिल्हा बँकेचे कर्ज फेड या सहकार क्षेत्रातील संस्था करू शकल्या नाहीत, म्हणून जिल्हा बँकेने आपल्या बँकेच्या व्यवहाराचा धर्म निभावला. तसे केले नसते तर जिल्हा बँकेचे एनपीए वाढून जिल्हा बँक दिवाळखोर निघाली असती. त्यामुळे चेअरमन संजय पवार यांचे हे उत्तर म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देणारे आहे. त्यात खडसेंची चूक काय? एकनाथ खडसेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन संजय पवार यांना अशाच पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यात दगडी बँकेची इमारत ज्या शहरातील मध्य वस्तीतील नवी पेठेत आहे, तिथे त्या बँकेच्या बाजूला असलेल्या जागेची किंमत एक चौरस फुटाला एक लाख रुपये असल्याचे कळते. समजा एवढे नसते तरी किमान 50 हजार तरी असेल. (कागदोपत्री भाव वेगळा असेल.) तरी 6500 चौरस फूट जागेला 30 ते 35 कोटी रुपये मिळतील. या मिळालेल्या रकमेतून जर तोट्यातील बँकेचे एनपीए कमी करून बँक नफ्यात आणायची म्हणून ही विक्री केली असती तर समजू शकले असते, असे खडसेंचे म्हणणे योग्य नाही काय? दगडी बँकेची जागा विक्री अत्यंत पारदर्शीपणे ऑनलाईन पद्धतीने करून त्याचा योग्य उपयोग केला जाईल, असे वारंवार संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसे सांगण्याची गरज काय? त्यामुळेच यात काहीतरी काळेबेरे दडलेले असणार याची शक्यता नाकारता येत नाही. जर दगडी बँक बचाव मोहीम शेतकऱ्यांनी सुरू केली, तर चेअरमन संजय पवार व त्यांच्या संचालक मंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार यात शंका नाही..!

Leave A Reply

Your email address will not be published.