शेंदुर्णी ता. जामनेर
आपल्या देशाचे आधारस्तंभ म्हणजे न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ हे सर्व भारतीय संविधानातल्या तरतुदी नुसार कार्य करीत असतात. भारतीय संवधान हे कायद्याची जननी आहे. जन्मा पासून ते अगदी मरे पर्यंत आपल्याला कायद्याची गरज भासते. असे प्रतिपादन येथील सरकारी विधीज्ञ ॲड. कृतिका भट यांनी केले.
येथील इंदिराबाई ललवाणी माध्य. विद्यालय जामनेरपुरा येथे आयोजित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम ‘घर घर संविधान’ अंतर्गत “संविधानाची निर्मिती व महत्त्व” या विषयावर ॲड. भट बोलत होत्या.
आपल्या भाषणात पुढे त्या म्हणाल्या की, आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याकडे स्वतःचे असे संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालविता येत नाही. म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, मौलाना अब्दुल कलाम, या समितीचे प्रमुख सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर आपल्या देशाचे संविधान अस्तित्वात आले. असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. चव्हाण, पर्यवेक्षक व्हीं. जी. महाजन, उप मुख्याध्यापक एस. एस. चौरे, व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. जी. घोती यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. अश्विनी महाजन यांनी केले.