‘विचारविनिमय’ केलेल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन!

पडळकर-आव्हाड समर्थकांच्या हाणामारीवर अभिनेत्याची खोचक पोस्ट

0

मुंबई : महाराष्ट्रा सारख्या राज्यात राजकारणाचा स्तर खालावत चालल्याची टीका गेल्या काही वर्षांपासून होताना दिसतेय. याचा प्रत्यय आता वारंवार येत आहे. विधिमंडळाच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळाले. या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेला वाद इतका वाढत गेला की, दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि अगदी मारहाणीपर्यंत हे प्रकरण गेले. सामान्य जनतेनेही राजकारण्यांच्या या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर काही कलाकार मंडळी देखील यावर व्यक्त झाले आहेत.

काय म्हणाला सुव्रत जोशी ?
अभिनेता सुव्रत जोशी याने या सगळ्या प्रकारावर खोचक पोस्ट शेअर केली आहे. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरून अत्यंत परिपक्वरित्या विधानसभेत लोकशाही पद्धतीने ‘विचारविनिमय’ केलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन! सुव्रतने या प्रकारावर खोचक पद्धतीने टीका केली आहे. तो नेहमीच सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होत असतो.

राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात, शेरेबाजूही सुरू असते. पण आता वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा घडणाऱ्या विधिमंडळाच्या परिसरातच दोन गटात जोरदार भांडणे झाल्याने घटनेला वेगळे वळण आले. आमदार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात काही दिवसांपासून खटके उडत होते. पडकळकरांनी माध्यमांशी बोलताना अनेकदा आव्हाडांवर शेरेबाजी केली होती. या सगळ्याचे पर्यवसान गुरुवारी संध्याकाळी थेट कार्यकर्त्यांच्या मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या परिसरातच पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून परस्परांवर शिवीगाळ करण्यात आली. नंतर उपस्थित सुरक्षारक्षकांनी नेते आणि कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या सगळ्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.