
लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री गौर – भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे नगराध्यक्षपद गेले. याप्रकरणी नगराध्यक्ष म्हणून विद्यमान नगरपालिका उपाध्यक्ष शैलजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. आज प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी त्यांनी जुना सातारा भागातील वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या व मित्र पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे नगरपालिकेत स्वीकारली. यावेळी घोषणांची व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नगरपालिकेत प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे या म्हणाल्या की, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जेवढा कार्यकाळ मिळणार आहे. त्या काळात भुसावळ मधील नागरिकांची सेवा करण्याची संधी मी घेणार आहे. त्यात सर्वप्रथम भुसावळकरांना आठ ते बारा दिवसानंतर जे पिण्याचे पाणी मिळते ते कमी कालावधीत कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. जे काही पिण्याचे पाणी देण्यात येईल ते पाणी शुद्ध व स्वच्छ असेल. त्यानंतर छेडल्या नारखेडे म्हणाल्या की, भुसावळची अमृत योजना लवकरात लवकर पूर्ण कशी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भुसावळचे नेते वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात विकासाची कामे करण्यात येतील. आता लगेच भुसावळ शहरातील जळगाव रोड आणि यावल रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तरी भुसावळकर जनतेसाठी मला जेवढा कालावधी मिळणार आहे, तेवढा कालावधीसाठी विकास करण्यासाठी सहकार्य करावे हीच माझी अपेक्षा आहे. भुसावळ नगरपालिका प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जेवढा कालावधी मिळेल तेवढ्या कालावधीसाठी विकास कामे करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा शैलजा नारखेडे यांनी व्यक्त केली आहेत. नवीन लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होऊन नवीन नगराध्यक्ष पदाची निवड होईपर्यंत प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे शैलजा नागडे यांच्याकडे राहणार आहे. नवीन निवडणूक प्रक्रिया जाहीर होईपर्यंत त्या प्रभारी नगराध्यक्ष राहतील. तोपर्यंत किती कालावधी जाईल हे सांगता येत नाही. निवडणूक प्रक्रिया लवकर जाहीर होऊ शकते किंवा काही अडथळे आल्यास तो कालावधी वाढू शकतो. गायत्री भंगाळे यांची निवड प्रक्रिया रद्द झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक जाहीर व्हायला हवी. बघूया काय होते ते. परंतु आज तरी लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या विरोधी नगराध्यक्ष म्हणून अडथळा दूर झाला आहे. गेल्या सहा महिने कालावधीतील अनुभव काही चांगला नाही. वारेमाप विकासाचे प्रस्ताव दिल्यानंतर ते महायुतीच्या नगरसेवकांकडून नाकारले जात होते, तर कोणती सर्वसाधारण सभा कोरम अभावी तहतूक होण्याचा सिलसिला चालू होता. त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षांना काम करणे मुश्किल झाले होते. त्यातच स्वीकृत सदस्य माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मनमानी कारभाराला महायुतीचे नगरसेवक कंटाळले होते. संतोष चौधरी हे आपण नगराध्यक्ष या थाटात काम करण्याच्या पद्धतीमुळे त्याला महायुतीच्या नगरसेवकांचा विरोध होता.
आता माजी आमदार संतोष चौधरी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे नगराध्यक्षपद गेल्यानंतर विविध प्रकारचे प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व प्रस्ताव महायुतीच्या नगरसेवकांनी धुडकवून लावले. त्यानंतर संतोष चौधरी यांनी भुसावळचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उकरून काढला आहे. रजनी सावकारे या मूळच्या गुजरात राज्याच्या असून त्यांचे जात प्रमाणपत्र वैध आहे की अवैध? हा मुद्दा भुसावळच्या जनतेसमोर ते मांडणार आहे. त्यामुळे भुसावळच्या लोकनेते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकूणच भुसावळ मध्ये संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे. त्यांचे हे वैर जगजाहीर आहे. कारण संतोष चौधरी आमदार असताना संजय सावकारे हे त्यांचे पी.ए. होते. भुसावळचे आमदारपद राखीव झाल्यानंतर संतोष चौधरी यांनी संजय सावकारे यांना उमेदवारी देऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. संजय सावकारे हे आमदार झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांना होती. पण संजय सावकारे आमदार झाल्यानंतर काही काळ ते संतोष चौधरी तसे सांगतील तसे वागत होते. परंतु अति झाल्यानंतर संजय सावकारे यांनी संतोष चौधरी यांची साथ सोडून दिली. त्यानंतर त्यांना रामराम ठोकला. संजय सावकारे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले. हे संतोष चौधरींना खटकले आणि तेव्हापासून ते एकमेकांचे शत्रू बनले आहेत. मग त्यातच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि संतोष चौधरींना जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ धरली आणि दुसऱ्या टर्म पासून भाजपचे आमदार म्हणून एकनाथ खडसेंच्या आशीर्वादाने निवडून आले. तेव्हापासून त्यांच्यात हाडवैर निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून संजय सावकारे यांना ते विरोध करत आहेत. आता नगरपालिकेतही तेच होते आहे..!

