लोकशाही क्रीडा विशेष लेख
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ ही केवळ पदकांची शर्यत नाहीत, तर राष्ट्रांच्या क्रीडा सामर्थ्याची, शिस्तीची आणि जिद्दीची कसोटी आहेत. जगभरातील ७४ राष्ट्रकुल देशांतील हजारो खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचा तिरंगा उंचावण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरला आहे. यंदाची स्पर्धा आर्थिक शिस्त आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे या पूर्वीच्या स्पर्धांपेक्षा आकाराने लहान असली तरी स्पर्धेची गुणवत्ता तितकीच उच्च आहे.
भारतासाठी ही स्पर्धा विशेष महत्त्वाची आहे. वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, नेमबाजीसारख्या अनेक क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंनी मागील काही वर्षांत सातत्याने जागतिक स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाही भारताकडून या स्पर्धेत मोठ्या पदकसंख्येची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः मीराबाई चानू आणि इतर अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंवर देशाच्या आशा खिळल्या आहेत.
मीराबाई चानूने तिच्याकडून देशवासीयांना असलेली अपेक्षा पूर्ण केली आहे. वेट लिफ्टर प्रकारात तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. याआधीच्या दोन स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्रिक करणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे म्हणूनच तिची ही कामगिरी ऐतिहासिक आहे. तिच्या या कामगिरीचा देशातील १४५ कोटी जनतेला अभिमान आहे. केवळ तीच नाही तर अन्य भारतीय खेळाडूंनी देखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरू केली आहे. ही आनंदाची बाब आहे.
आज भारतात क्रीडा क्षेत्राला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी मिळत आहे. आधुनिक प्रशिक्षण, आहार, क्रीडा विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी भारत आता केवळ सहभागापुरता मर्यादित न राहता पदकांचा प्रबळ दावेदार म्हणून ओळखला जात आहे. तथापि, केवळ काही मोजक्या खेळांवर अवलंबून राहून चालणार नाही. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी तळागाळात क्रीडा संस्कृती रुजवणे, शालेय स्तरावर क्रीडेला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षकांची गुणवत्ता वाढवणे आणि ग्रामीण भागात उत्कृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही केवळ सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदकांची लढाई नाही; ती राष्ट्राच्या आत्मविश्वासाची, शिस्तीची आणि युवा शक्तीची ओळख आहे. प्रत्येक भारतीय खेळाडू मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यासोबत १४५ कोटी भारतीयांच्या अपेक्षा आणि शुभेच्छा असतात. त्यांच्या यशातून देशातील नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची उमेद निर्माण होते. भारतीय खेळाडूंनी ग्लासगोमध्ये दमदार कामगिरी करून तिरंगा अधिकाधिक वेळा उंच फडकवावा, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ भारतासाठी केवळ पदकांची नव्हे, तर नव्या क्रीडा युगाची सुरुवात ठरावी, हीच सदिच्छा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

