पहाटेचा धडाका : जळगावात कोम्बिंग ऑपरेशनने गुन्हेगारी विश्वाला हादरा !
सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुख्यात ताब्यात ; कसून चौकशी
पहाटेचा धडाका : जळगावात कोम्बिंग ऑपरेशनने गुन्हेगारी विश्वाला हादरा !
सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुख्यात ताब्यात ; कसून चौकशी
प्रतिनिधी | जळगाव पहाटेच्या चौथ्या प्रहरी, जेव्हा संपूर्ण जळगाव शहर गाढ झोपेत होते, तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरात चक्रव्यूह रचत अभूतपूर्व कोम्बिंग ऑपरेशन राबवले. आगामी सणोत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या अचानक कारवाईने हद्दपार गुंड, पाहिजे असलेले आरोपी आणि कुख्यात गुन्हेगारांना हादरवून सोडले.
पहाटेच्या शांततेत पोलिसांनी जिल्हापेठ, तालुका, रामानंद, एमआयडीसी आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी धडक मोहीम उघडली. गल्लीबोळ, संशयास्पद ठिकाणे, झोपडपट्ट्या आणि हॉटेल परिसरात पोलिसांनी झडती घेतली. या मोहिमेत अनेक कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले, तर काहींकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. सर्वांना चौकशीसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, सध्या त्यांची ओळख परेड आणि चौकशी सुरू आहे.
या अचानक धडक कारवाईने शहरातील गुन्हेगारी विश्वात भयाचे सावट पसरले आहे. काही ठिकाणी पोलिसांची हालचाल सुरू होताच संशयितांनी ठिकाण सोडून दिल्याची माहितीही समोर आली आहे.
“सणासुदीचा काळ आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे कर्तव्य आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येईल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल,” असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
या धडाकेबाज कारवाईबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, “जळगाव पोलिसांचा हा धडाका गुन्हेगारीला खीळ घालणारा ठरेल,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांचा हा ‘ऑपरेशन धडक’ पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.