भुसावळमध्ये कोम्बिंग ऑपरेशन : चार संशयितांना पकडले
संवेदनशील क्षेत्रांत गस्त वाढवली; सणासुदीसाठी कडक सुरक्षा
भुसावळ (प्रतिनिधी) : दुर्गा देवी उत्सव, नवरात्र आणि येणाऱ्या सण-उत्सवांच्या निमित्ताने भुसावळातील इराणी मोहल्ला आणि पापा नगर भागात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात जबरी चोरी, फसवणूक तसेच इतर गुन्ह्यांतील फरार रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांना पकडण्यात यश आले. पोलिस प्रशासनाने सणासुदीच्या काळात शांतता राखण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना केल्या असून, संशयितांच्या तपासणीसाठी गस्त आणि कोम्बिंग मोहिमा सुरू आहेत.
शहरातील बाजारपेठा, वस्त्या, गर्दीची केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, रेल्वे पोलिस, गुप्तचर विभाग तसेच जिल्हा पोलिस दलातील जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुल वाघ, संदीप नाईक यांच्यासह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.
नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भुसावळेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही संवेदनशील भागांत फरारी आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींची माहिती मिळाल्याने, त्या ठिकाणी विशेष कोम्बिंग ऑपरेशनद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संवेदनशील भागांत रूटमार्च
संध्याकाळी संवेदनशील क्षेत्रांत रूटमार्च आयोजित करण्यात येणार आहे. फरारी असल्याची शक्यता असलेल्या भागांत अतिरिक्त मोहिमा राबवल्या जाणार आहेत, असेही वाघ म्हणाले. नवरात्र आणि विसर्जन मिरवणुकीसाठी ३० सप्टेंबर, १ आणि २ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. तर ३ ऑक्टोबरच्या मोठ्या मिरवणुकीसाठी विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे.
तालीब अली रशिद अली (वय २०, रा. रझा टॉवर) हा एमआयडीसी वरणगाव पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरी प्रकरणात पसार होता. तर मोहम्मद अली लियाकत अली (वय ३५, रा. रझा टॉवर) हा मध्य प्रदेशातील वरला पोलीस ठाण्यातील फसवणूक गुन्ह्यात फरार होता. त्याच्याविरुद्ध हातचालाखी करून फसवणूक आणि जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. उर्वरित दोन फरारींची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

