जिल्हाधिकारी रोहन घुगे: लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी दिशा
प्रशासकीय कारकिर्दीत नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रमांद्वारे विकासाचा नवा आदर्श
जळगाव प्रतिनिधी I जिल्हा परिषद ठाणेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे (भाप्रसे) यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रमांद्वारे विकासाचा नवा आदर्श घालून दिला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात त्यांनी डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि पारदर्शक शासनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. आता जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना हि माहिती दिली .
ठाणे जिल्हा परिषदेतील उल्लेखनीय कार्य
रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेने अनेक क्षेत्रांत प्रगती साधली. त्यांच्या कार्याची दखल घेणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या ‘कार्यालयीन मूल्यमापन – 100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
काही प्रमुख उपक्रम खालील प्रमाणे..
Door Step Delivery – नागरिकांच्या दारापर्यंत शासन
नागरिकांना घरबसल्या शासकीय कागदपत्रे मिळावीत यासाठी ‘Door Step Delivery’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला गेला. याअंतर्गत 431 ग्रामपंचायतींमध्ये सेवा कार्यान्वित करून नागरिकांना थेट घरीच कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली.
दिशा उपक्रम ; शिक्षणातील क्रांती
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी ‘दिशा उपक्रम’ राबवला गेला. यामध्ये 31 लाख एआय-आधारित चाचण्या घेण्यात आल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा भाषा आणि गणित विषयातील अध्ययन स्तर दुपटीने वाढला. या उपक्रमाला ‘निपुण महाराष्ट्र’ योजनेत समाविष्ट करण्यात आले.
ई-ऑफिस आणि डिजिटल शासन
सर्व फाईल्स आणि पत्रव्यवहाराचे डिजिटायझेशन करून ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू करण्यात आली. यामुळे कागदविरहित कामकाज, सात दिवसांत नस्ती निपटारा आणि पारदर्शक प्रशासन हे ठाणे जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य बनले.
स्कीम ॲप्लिकेशन पोर्टल
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती आणि अर्ज सादरीकरणासाठी एकत्रित डिजिटल पोर्टल तयार करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना योजनांचा लाभ घेणे सोपे झाले.
Block Facilitation Committee
तालुका स्तरावर ग्रामस्थांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी ‘ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी’ स्थापन करण्यात आली. यामार्फत अधिकाऱ्यांनी ग्रामपातळीवर भेटी देऊन अडचणी सोडवल्या.
ई-कामवाटप आणि ई-एचआरएमएस
विकासकामांचे पारदर्शक वाटप आणि 500 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवा पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
एआयचा उपयोग – स्मार्ट प्रशासन
शासकीय टिपणी, अहवाल, सादरीकरण आणि दस्तऐवज विश्लेषणासाठी ChatGPT, NotebookLM, Canva, Gamma आणि Myka App यांचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे सुशोभीकरण
स्वच्छता, रंगरंगोटी, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष आणि माहितीपर Kiosk यांसारख्या सुविधांद्वारे नागरिकांना सुलभ सेवा देण्यावर भर देण्यात आला.
दापूरमाळ येथील विकासकामांना गती
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम दापूरमाळ येथे रोहन घुगे यांनी विकासकामांना गती दिली. यामध्ये
रस्ते: वनविभागाच्या सहकार्याने 5 किमी रस्त्याचे काम सुरू.
घरकुल: 33 मंजूर घरकुलांचे बांधकाम सुरू, CSR निधीतून विशेष सहाय्य.
पाणीपुरवठा: अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित.
शाळा आणि अंगणवाडी: बांधकामासाठी साहित्य वाहतूक पूर्ण करून कामाला प्रारंभ.
पुरस्कार आणि मान्यता
रोहन घुगे यांच्या ‘मिशन दीपस्तंभ’ उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढीकरिता ‘स्कॉच पुरस्कार’ मिळाला. याशिवाय, वर्धा जिल्ह्यात कुपोषणमुक्त गाव, पीएम विश्वकर्मा, कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रकल्पांनी त्यांच्या नेतृत्वाची छाप पाडली.
प्रेरणादायी प्रवास: लंडनची नोकरी सोडून लोकसेवेचा वसा
रोहन घुगे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मूळचे नांदेडचे असलेले रोहन यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले. नांदेडच्या सैनिकी स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर, MHT-CET मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून त्यांनी पुण्याच्या COEP मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली. पदवीनंतर लंडन येथे नोकरी मिळाली, परंतु स्वयंसेवी संस्थांमधील कामातून त्यांना लोकसेवेची प्रेरणा मिळाली.
त्यांनी लंडनची नोकरी सोडून भारतात परत येऊन UPSC परीक्षेची तयारी केली. 2017 मध्ये एकाच वर्षी आयएएस आणि आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी इतिहास रचला. विशेष म्हणजे, भूविज्ञान (Geology) हा विषय घेऊन या दोन्ही पदांवर निवड होणारे ते भारतातील एकमेव उमेदवार ठरले.
चंद्रपूर आणि वर्धा येथील अविस्मरणीय कार्य
चंद्रपूर येथे गौंड इतिहासावर आधारित ऐतिहासिक डॉक्युमेंटरी आणि वर्धा येथील ‘वर्धिष्ण पॅटर्न’ यांसारख्या उपक्रमांनी त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. त्यांच्या साध्या आणि लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जनतेचा विश्वास संपादन केला.
जळगावकरांचा अभिमान, नव्या जबाबदारीकडे वाटचाल
जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुगे यांच्या नियुक्तीमुळे जळगावकरांमध्ये उत्साह आहे. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, यात शंका नाही. त्यांच्या कार्याला यश मिळावे, यासाठी जळगावकरांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना!
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी रोहन घुगे यांना हार्दिक शुभेच्छा!