शिक्षकांनी क्षमता वाढवावी, त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल !
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिपादन : शिक्षकांसोबत संवाद
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी शिक्षकांनी आत्मविश्लेषण करून आपली क्षमता वाढवावी, जेणे करून त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल असे शिक्षकांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले. असरच्या अहवालात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती मागे असल्याने सुधारणा आवश्यक आहे. शिक्षकांनी झपाटून काम करून जिल्ह्याला राज्यातील टॉप टेनमध्ये आणावे, यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुमारे 500 शिक्षकांशी दोन तास संवाद साधला. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, डीईटी प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखा आणि त्यानुसार शिकवा, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवा, आत्मियता जोपासून विद्यार्थ्यांना सक्षम बनवा, प्रत्येक विषय सोप्या पद्धतीने शिकवा, शिकवलेले पुनरावृत्ती करून त्यांच्या आकलनाची खातरजमा करा, गणित आणि भाषा विषय सोपे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळ शिक्षकांना कानमंत्र दिला. त्यात गणित शिक्षणासाठी संख्या ओळख, चार गणितीय क्रिया, प्रश्नांचे वर्गीकरण, पडताळणी आणि सराव या पाच टप्प्यांतून विद्यार्थ्यांना गणित समजावून द्या.
भाषा शिक्षणासाठी अक्षर वाचन, शब्द वाचन, वाक्य वाचन, चर्चा व संवाद या पायऱ्यांमधून भाषा शिकवावी असे आवाहन केले. शिक्षकांनी निष्ठेने आणि आत्मियतेने विद्यार्थ्यांना शिकवल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल आणि जळगाव जिल्हा शैक्षणिक यशाच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.