लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून थंडी वाढतच चालली आहे. जळगाव सह पाच जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेजारच्या धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी तापमान ४ अंश इतकी नोंद झालेली आहे. त्या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुद्धा थंडीची लाट आलेली आहे. शनिवारी ८.५° इतके तर रविवारी ७.९° इतके तापमान नोंदवले गेले. उत्तरेकडील शीतलहरीमुळे दिवसा सुद्धा हुडहुडी भरते आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असून व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, ताप आणि खोकल्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. लहान बालकांना या वाढत्या थंडीचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे लहान बालकांमध्ये न्यूमोनियाची लागण होत असल्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये बालरुग्ण भरती वाढली आहे.
वाढत्या थंडीपासून जनतेने सुरक्षित राहण्यासाठी शक्यतो रात्रीच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडतांना आवश्यक ते गरम कपडे अंगात घालून बाहेर पडावे. मोठ्यांमध्ये सुद्धा सर्दी, ताप, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप खोकल्याचा प्रतिकार करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या थंडीचा परिणाम उघड्यावर बसलेल्या पशुधनाला सुद्धा होत असल्यामुळे जनावरांमध्ये सुद्धा रोगाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी बंद गोठ्यात जनावरांना ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. वाढत्या थंडीमुळे गरम कपड्यांची खरेदी विक्री वाढली आहे.
वाढती थंडी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसाठी फायद्याची असल्याने यंदा रब्बी हंगाम चांगल्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढती थंडीची लाट शेतकऱ्यांसाठी खुशखबरीची म्हणावी लागेल. वाढत्या थंडीचा आणखी फायदा म्हणजे यंदा आंब्यांना चांगला मोहोर येऊन आंब्याच्या सिझन चांगला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळांचा राजा आंबा याचे पीक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीचे जसे तोटे आहेत, तसे फायदे आहेत. परंतु आपल्या जिल्ह्यासारख्या उष्ण प्रदेशात अति थंडीच्या लाटेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करणे हे गरजेचे आहे.