कॉफी शॉपवर पोलिसांचा छापा; अश्लील चाळ्यांवर कारवाई, व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
जळगाव : प्रतिनिधी रामानंद नगर पोलिसांनी शहरातील एम.जे. कॉलेज रोडवरील ‘चॅट अड्डा’ नावाच्या कॉफी शॉपवर बुधवारी दुपारी कारवाई केली. या ठिकाणी तीन तरुण आणि तीन तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची नावे, पत्ते नोंदवून समज दिल्यानंतर त्यांना सोडून दिले. मात्र, संबंधित कॉफी शॉपच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना या ठिकाणी संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. दुपारी सव्वा दोन वाजता पथकाने ‘चॅट अड्डा’ (अन्नपूर्णा फुड्स) येथे छापा टाकला असता, विद्यार्थ्यांचे अनुचित वर्तन आढळले.
तपासादरम्यान पोलिसांना या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी आवश्यक साहित्य, गॅस, कॉफी पावडर किंवा इतर वस्तू आढळल्या नाहीत. तसेच दुकानाकडे कोणताही वैध परवाना नव्हता. दुकानाच्या आतील भागात प्लायवूड व पार्टिकल बोर्डने बनवलेले छोटे कप्पे तयार करण्यात आले होते आणि त्यांना पडदे लावून गुप्त जागा तयार करण्यात आली होती.
छाप्यात आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने व्यवस्थापक मयूर धोंडू राठोड (वय २५, रा. वाघनगर, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस अधिकारी जितेंद्र राठोड, योगेश बारी आणि जितेंद्र राजपूत यांनी सहभाग घेतला.