पिंपरी, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा परिसर राज्याच्या उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येथे येत असूनही त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी उद्योगांकडून केल्या जातात. उद्योगांना त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला सोडू नका. उद्योगांना त्रास देणाऱ्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) माध्यमातून कारवाई करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाच्या महाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल व पोलिस विश्रामगृह देहूरोड या इमारतींचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, आण्णा बनसोडे, महेश लांडगे, शंकर जगताप, विजय शिवतारे, सुनील शेळके, शरद सोनवणे, बाबाजी काळे, बापू पठारे यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी या वेळी उपस्थित होते.
दक्षता घेण्याची सूचना !
काही पक्षाचे लोक उद्योगांना त्रास देतात. आमचे असतील, अजित पवार यांचे असतील, एकनाथ शिंदे यांचे असतील; कोणत्याही पक्षाचे असले, तरी ‘मकोका’ची कारवाई करावी. महाराष्ट्रामध्ये उद्योगांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी तंबी फडणवीस यांनी दिली. विविध ठिकाणी उद्योगांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. राज्यात उद्योजक येत असल्याने, गुंतवणूक वाढत असल्याने उद्योजकांना, उद्योगांना पोषक वातावरण असणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.