‘वर्ल्ड इकॉनॉमिक’ फोरमच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ‘वर्ल्ड इकॉनॉमिक’ फोरमसाठी (World Economic Forum) दावोस येथे दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) रवाना झाले. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यामध्ये जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचा करार होणार आहे. आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामजंस्य करार होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर गुंतवणूकदार तसेच अनेक मोठ्या उद्योगांच्या प्रमुखांबरोबर ते संवाद साधणार आहेत. या दौऱ्यावेळी 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस ते या परिषदेमध्ये उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) तसेच वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत. ही परिषद 20 जानेवारी पर्यंत चालणार असून जागतिक पातळीवरील अनेक बड्या उद्योगाबाबत चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018’ (‘Magnetic Maharashtra Convergence-2018’) या राज्याच्या महत्त्वाकांक्षी उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील जवळपास अडीच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय येत, राज्यात किती रोजगार उपलब्ध होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.