मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे जिल्ह्यात विकासाचा धडाका

0

लोकशाही संपादकीय लेख

एकनाथ शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत येऊन साडेचार महिने झाले. या छोट्याशा कालावधीत मुख्यमंत्री शिंदेंकडून महाराष्ट्रात विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण आदी सोहळ्याचा धडाका सुरू आहे. असंविधानिक सरकार म्हणून शिंदे फडणवीसांवर विरोधक जोरदार आरोप करीत असले, तरी मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्रभर फिरस्ती चालू आहे. गेल्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री शिंदे एकट्या जळगाव जिल्ह्यात तिसऱ्यांदा येत आहेत पहिला जळगावचा दौरा पूर्णतः राजकीय होता. संघटनात्मक स्थैर्य पक्षाला मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यात पाळधी आणि मुक्ताईनगरला दौरा झाला. त्यानंतर बडगुजर समाजाच्या मेळाव्यासाठी त्यांनी आपली उपस्थिती देऊन या छोट्याशा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा धावता का होईना दौरा केला. त्यानंतर आता गुरुवार 16 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तो त्यांचा दौरा पूर्णपणे विकास कामांना वाहिलेला आहे. मुख्य म्हणजे जळगाव तालुका आणि चोपडा तालुक्याला जोडणारा भोकर येथील तापी नदीवरील १५० कोटी रुपये खर्चाचा पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे हस्ते दुपारी साडेतीन वाजता भोकर येथे होणार आहे. याच ठिकाणहून विविध विकास कामांचे भूमिपूजन होईल. त्यात धरणगाव येथील ७५ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे इतर कामांचे भूमिपूजन ऑनलाईन होणार आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे लोकार्पण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव भोकर येथील विकास कामाचा समावेश आहे. भोकर तापी नदीवरील पुलाचा अर्धा भाग जळगाव ग्रामीण मतदार संघात येतो आणि अर्धा भाग चोपडा विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे समर्थक आमदार गुलाबराव पाटील आणि चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार लताबाई सोनवणे यांच्यासाठी विकास कामे मंजूर केली, हे विशेष होय. १५० कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाला मंजुरी देऊन जिल्ह्यातील दळणवळणाला एक प्रकारे मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः हा परिसर केळी पिकवणारा परिसर असल्याने केळी वाहतुकीसाठी सोयीचे होणार आहे. जळगाव आणि चोपड्याचे अंतर भोकर पुलामुळे कमी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांचा धडाका सुरू काला केला आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन झाले, तरी ते निहित वेळेत पूर्ण व्हावेत, ही अपेक्षा. अन्यथा भूमिपूजन झाल्यानंतर काम निधी अभावी थंड बस्त्यात पडायला नको.

सध्या शिंदे फडणवीस सरकारच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात चालू असून ठाकरे व शिंदे गटातर्फे त्यांना वकिलाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सरकारच्या भवितव्याचा फैसला सुप्रीम कोर्टात काय होईल, हे सांगणे कठीण असताना अशा परिस्थितीत सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास कामांच्या संदर्भात दौऱ्याचा धडाका चालू ठेवला आहे, हे विशेष. या शिवाय जळगाव जिल्हा हा एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जळगाव जिल्ह्यात एकूण पाच आमदार त्यांचे समर्थक आहेत. या पाचही आमदारांचे भवितव्य येत्या विधानसभा निवडणुकीत अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. त्यातच शिवसेनेतील फुटी नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्वसामान्य शिवसैनिक असल्यामुळे त्याचा धोका शिंदे गटासाठी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येते. त्यामुळे या पाच आमदारांची आगामी निवडणुकीची वाट खडतर राहणार या शंका नाही. त्यातच भाजपची वेगळी वाट त्यांना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघासाठी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. तीच परिस्थिती पारोळा एरंडोल मतदारसंघाची आहे. विद्यमान सिद्ध गटाचे शिवसेना आमदार चिमणराव पाटलांसाठी आगामी विधानसभा निवडणूक म्हणजे फार मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास चिमणराव पाटलांच्या मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. परंतु हाच टेम्पो दीड वर्षाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असणे आवश्यक असले पाहिजे. परंतु दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल आणि त्यावेळी परिस्थिती कशी असेल, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.