दौरा, बैठका, धावपळ अन्‌ प्रचंड ताप, तरी शिंदे कामात !

अजित पवारांचा संताप : कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

शनिवार आणि रविवारी सततची धावपळ, पंतप्रधान मोदी यांचा दौरा, तिथून मुंबईत येऊन मंत्रीमंडळ बैठक, त्यात असंख्य विषय, या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 101 अंशपर्यंत ताप होता. थकवा होता, तरीही ते सतत काम करत होते. अखेर उपमुखमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषेत मुख्यमंत्र्यांच्या स्टाफची बैठकीतच शाळा घेतली, बस झाल्या बैठका, मुख्यमंत्र्यांना आराम करु देणार आहात की नाही? ते आजारी आहेत हे तुम्हाला समजत नाही का? अशा शब्दात अजितदादांनी मुख्यमंत्र्यांच्या स्टाफला फटकारले आहे.

दादा रागावतात तेव्हा ते काय आणि कसे बोलतात हे महाराष्ट्राला माहित आहे. ही माहिती ऐकिव नाही, तर बैठकीत उपस्थित असलेल्यांकडून मिळालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड काम करतात हे सगळ्या राज्याने बघितले आहे. पूर्वी तर मंत्रालयात दरबार भरायचा आणि ते प्रत्येकाला भेटायचे. राज्याच्या प्रमुखाची सुरक्षा महत्त्वाची असते, म्हणून मंत्रालयातील हा जनता दरबार बंद झाला. असे असले तरी वर्षा असो वा नंदनवन, अजूनही तिथे रात्री उशिरापर्यंत भेटणाऱ्यांची गर्दी असते आणि मुख्यमंत्री त्या प्रत्येकाला भेटतात. आपण अनेकदा नोटीस केले असेल की पक्ष प्रवेश रात्री 10 वाजेनंतर, कधी कधी रात्री 12-1 वाजता झालेले आहेत. मुख्यमंत्री होण्याआधी एकनाथ शिंदे ठाण्यात पहाटे 3 वाजेपर्यंत जनतेला भेटत असत. ते झोप कधी घेतात असे आश्चर्य खुद्द उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. सकाळी राज्याच्या एका टोकाला तर दुपारी दुसरे टोक गाठून रात्री मुंबईत वर्षावर बैठक घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याने बघितले आहे. वय हा घटक महत्त्वाचा असतो.

राजकीय नेत्यांना स्वतःसाठी आणि राज्यासाठी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक असते. आज आपल्या राज्यतील अनेक नेते किडनी, रक्तदाब आणि अन्य आजाराने त्रस्त असूनही सतत काम करत असतात, लोकांना भेटत असतात. पण, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

 

शिंदेंना दिला प्रेमाचा सल्ला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा तापाने फणफणले आहेत. अशा वेळी ते एकतर ठाण्यात थांबतात किंवा गावी जातात. अर्थात मुख्यमंत्री हे पद असे आहे की ते आजारी असले तरी त्यांना आराम नसतो. पण मुख्यमंत्री साहेब, विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आहे, खूप फिरायचे आहे, तब्येत सांभाळा, काम आणि वेळेचे नियोजन करा, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे, असाही प्रेमाचा सल्ला मुख्यमंत्री महोदयांना अनेकांनी दिला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.