लोकशाही संपादकीय लेख
जळगाव महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात सुरू झाला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षातील उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जळगाव प्रचार रॅली घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन उमेदवारांसह त्यांचे समर्थक कार्यकर्ते मतदारांची मनधरणी करीत आहेत. दिवसभर प्रचारांमध्ये सर्वच उमेदवारांची रिक्षाद्वारे घोषणाबाजी होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जळगाव शहर दुमदुमले आहे. दुपारचा वेळ थोडा शांतपणे जातो; परंतु सकाळ आणि सायंकाळ मात्र प्रचाराने रंगत निर्माण होते आहे. एकूण 75 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपचे सहा आणि शिवसेनेचे सहा असे एकूण महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता एकूण 63 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष आणि अपक्षांसह एकूण 333 उमेदवार प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप तसेच शिवसेना पक्षातील निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. आणि हे सर्व अपक्ष भाजप तसेच शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढविणारे असल्याने भाजपने 69 बंडखोरांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा केली आहे. त्यांच्या हकालपट्टीमुळे अपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तरीसुद्धा काही अपक्षांकडून पक्षांच्या दिग्गज उमेदवारांच्या नाकी नऊ आणले जात आहेत. पक्षांच्या उमेदवारांची स्थिती अटीतटीची बनलेली आहे. प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे निवडणूक लढवीत आहेत. तसेच भाजप तर्फे माजी महापौर नितीन लढ्ढा हे सुद्धा निवडणूक लढवीत आहेत. हा प्रभाग नितीन लढ्ढा आणि विष्णू भंगाळे यांच्या पारंपारिक प्रभाग असून तेथूनच ते निवडून येतात. परंतु हा प्रभाग नव्याने निर्माण झाला काही नवीन भागाचा त्यात समावेश झाला आहे. याच वार्डातून सध्या भाजपचे बंडखोर उमेदवार पियुष गांधी हे नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या नितीन लढ्ढा यांच्यासमोर निवडणूक लढवीत आहेत. अपक्ष पियुष गांधी यांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या संपर्कामुळे भाजपचे नितीन लढ्ढा यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्रमांक पाच मधील पियुष गांधी यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे नितीन लढ्ढा यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
प्रभाग क्रमांक पाच मधील दुसरे उमेदवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या विरोधात माजी नगरसेवक व समाजसेवक कै. नरेंद्र पाटील यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी विष्णू भंगाळे यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे वार्ड क्रमांक चार मधून कै. नरेंद्र पाटील सतत अपक्ष म्हणून निवडून येत असत. प्रभाग क्रमांक चारचा बराचसा भाग प्रभाग क्रमांक पाचमध्ये असल्यामुळे कै. नरेंद्र पाटील यांची पुण्याई अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना मिळतेच आहे. या प्रभागात पियुष पाटील हे जरी नवखे असले तरी नरेंद्र पाटील यांच्या जोरावर त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पियुष पाटील हे सुद्धा आपले पिता कै. नरेंद्र पाटील यांच्याप्रमाणेच आक्रमक असून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विरोधात आपल्या आक्रमक भाषणाने जोरदार हल्ला चढवीत आहेत. त्यातच शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे तुकाराम वाडीत प्रचार रॅलीद्वारे प्रचार करीत असताना एका महिलेद्वारे विष्णू भंगाळे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना प्रचारातून सळो की पळो करून सोडले होते. उमेदवारांवर केलेल्या महिलेच्या हल्ल्यामुळे तेथून विष्णू भंगाळे यांना काढता पाय घ्यावा लागला. वास्तविक विष्णू भंगाळे यांनी या घटने संदर्भात विशेष गंभीरतेने न घेता ‘अपक्ष उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ असा आरोप विष्णू भंगाळे यांनी केला असला तरी त्यात विशेष असा आत्मविश्वास दिसला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी मात्र विष्णू भंगाळे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. आता दोन दिवसच जाहीर प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. सर्व उमेदवारी उमेदवारांमध्ये धाकधूक वाढवणारी ही निवडणूक मात्र चांगलीच रंगात आली आहे…!