अज्ञात लिंकवर क्लिक करणे ठरले महाग; ७९ वर्षीय शिक्षक सायबर फसवणुकीचा बळी

0

जळगाव : तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असून, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे एका ७९ वर्षीय निवृत्त शिक्षकाची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ८९ हजार ९९२ रुपये लंपास करण्यात आले आहेत.

भुसावळ येथील आदर्श हायस्कूलचे निवृत्त शिक्षक माधवदास खिल्लूमल शुगानी हे ५ सप्टेंबर रोजी आजारी होते. औषधांची यादी डाऊनलोड करण्याच्या प्रयत्नात असताना चुकून एका अज्ञात लिंकवर त्यांनी क्लिक केले. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी ती लिंक तत्काळ डिलीट केली आणि विश्रांतीसाठी झोपून गेले. त्यानंतर सलग १२ दिवस आजारपणामुळे त्यांनी मोबाईल वापरला नाही.

१५ सप्टेंबर रोजी बँक खात्याची शिल्लक तपासली असता त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून ७ लाख ८९ हजार ९९२ रुपये गायब झाल्याचे आढळून आले. विशेष बाब म्हणजे, ही रक्कम काढली जात असताना त्यांना कोणताही ओटीपी प्राप्त झाला नाही तसेच त्यांनी कोणालाही बँकिंगविषयक गोपनीय माहिती दिलेली नव्हती. सायबर चोरट्यांनी सुमारे दहा दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही रक्कम खात्यातून काढून घेतली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुगानी यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.