लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील सडावण बुद्रुक येथे अनधिकृतपणे गौण खनिज मुरुमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेऊन तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आल्या आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सडावण बुद्रुक परिसरात अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात पाहणी केली असता मुरुमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले. वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी संबंधितांकडे नसल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.
कारवाईनंतर दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच संबंधित मुद्देमाल तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आला. गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून परिसरात तपासणी व कारवाई सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पी. एस. पाटील, वावडे भाग तसेच ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील (शिरसाळे बु.), मुकेश देसले (पाडसे), भूषण पाटील (कळमसरे), कल्पेश कुवर (फाफोरे बुद्रुक), संदीप माळी (मांडळ), एम. आर. पाटील (जैतपीर) आणि अमोल चक्रे (जवखेडे) यांच्या पथकाने सहभाग घेतला.
गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने महसूल विभागाकडून अशा प्रकारच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

