वाघळीत युवकाचा सिने स्टाईल खून; तीन आरोपींना अटक…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील वाघळी येथे काल दि. १२/१०/२०२२ रोजी पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मृताचे काका जखमी झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाच पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेनतंर गावात तणाव वाढल्यामुळे रात्रीपासून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सय्यद मुसा खाटीक, साजिद मुसा खाटीक, आदिल साजिद खाटीक, तनवीर साजिद खाटीक, सय्यद समीर खाटीक सर्व राहणार वाघळी, यांनी वाघळी गावातीलच मोहन विजय हाडपे (वय १८) या तरुणाला गावात असलेल्या व्यायाम शाळेजवळ एकमेकाकडे पाहण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घातला त्यानंतर शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान मोहन हडपे याचे काका रवींद्र भास्कर हडपे या ठिकाणी भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांना देखील या पाच आरोपींनी रॉड डोक्यात घालून दुखापत केली. तर मोहन हडपे याचे आदिल खाटीक, तनवीर खाटीक, समीर खाटीक यांनी दोन्ही हात पकडून धरत आदिल साजिद खाटीक याने त्याच्या जवळील चाकूने मोहनच्या पोटावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर मोहन याला उपचारासाठी चाळीसगाव येथे घेऊन जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर काका रवींद्र हाडपे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस वाघळी गावात दाखल झाले, या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आरोपींवर कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.